नितीन काळे
खडकी : महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या छायाचित्राला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा गटाकडून जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे सोलापूर महामार्गावरील खडकी येथे दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्या वैशाली नागवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले.
माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी गोपीनाथ पडळकर यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. आणि जर कोणी अजित पवार अथवा पवार कुटुंबियांवर खालच्या दर्जाची टीका केली तर जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशाराही दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष उत्तमराव आटोळे, दत्तात्रय शेलार, संभाजी ताकवणे, मंगेश शितोळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सचिन काळभोर यांनी मनोगत व्यक्त करत पडळकरांचा निषेध केला.
खडकी ग्रामपंचायत समोर पुणे-सोलापूर हायवेवर खडकी आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी, तरुण सहकारी यांनी ‘या पडळकरच करायचं काय, खाली डोकं वर पाय’ अशा घोषणा देत आणि जोडे मारत निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनावेळी तालुक्यातील सागर फडके, माऊली लोंढे, गजानन गुनवरे, प्रकाश नवले, मिलिंद मोरे, पुरुषोत्तम हंबिर आणि खडकी गावातील पदाधिकारी, सहकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.