अब्बास शेख
दौंड तालुक्यातील केडगाव हे मिनी शहर म्हणून ओळखले जाते. सध्या या केडगावची वाटचाल मोठ्या शहरीकरणाच्या दिशेने सुरु आहे. हे सर्व होत असताना नागरिकांच्या गरजेनुसार येथे घरे, इमारती आणि व्यावसायिक गाळ्यांची कामे वाढत आहेत आणि त्याच बरोबर ब्लॅकमेलिंग करणाऱ्या दलालांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
नागरिकांच्या जमिनीचे ‘एनए’ रूपांतर आणि बांधकामची गरज आणि अडचण हेरून येथे काही ‘गब्बर’ दलाल सक्रिय झाले आहेत. आणि ते आता अधिकाऱ्यांच्या नावाने नागरिकांना धमक्या देऊन त्यांना ब्लॅकमेल करत असल्याची चर्चा संपूर्ण केडगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. तुमची जमीन ‘एनए’ नॉन अॅग्रीकल्चर करायची आहे, तुमच्या घराचे काम सुरु आहे मग त्याला बांधकाम मंजुरी (टीपी किंवा पीएमआरडीए) परवानगी घेतली का..? असा प्राथमिक सवाल हे दलाल बांधकाम करणाऱ्या लोकांना करतात.
परवानगी घेतली नसेल किंवा फाईल तयार करून सरकारी कार्यालयात जमा केली असेल तर त्याची सर्व माहिती या दलालांकडे असते हे विशेष. त्यामुळे त्या फाईलमध्ये असलेल्या (किंवा तयार केलेल्या) त्रुटी हे दलाल लोक बांधकाम धारक, एनए साठी हेलपाटे मारणाऱ्या नागरिकांना दाखवून तुम्ही परवानगी घेतली नसेल तर कारवाई करू आणि जर परवानगी मिळवायची असेल तर ते काम आम्हीच करून देऊ असे आश्वस्त करतात.
आणि येथून खरा पैसे लुबाडण्याचा कार्यक्रम सुरु केला जातो, आम्हाला इतके-इतके लाख द्या, अनधिकृत कामही अधिकृत करून देऊ..! अमुक-अमुक चे काम अधिकृत बसत नव्हते पण मी करून दिले तसेच तुमचेही करून देऊ फक्त मजबूत पैसा सोडा. आणि जर आम्हाला हे काम दिले नाही तर तुमची फाईल मंजूर होणारच नाही, अनेक साहेब आम्हाला मॅनेज आहेत. त्यामुळे अनेकांच्या फाईल तिथे जाऊन का रिजेक्ट झाल्या याची माहिती घ्या अश्या प्रकारच्या धमक्या हे दलाल लोक सर्वसामान्य नागरिकांना देऊन ब्लॅकमेल करत आहेत.
या सर्वाची प्रचिती नुकतीच काहींना आली असून एका दलालाला एका घरगुती बांधकाम सुरु असलेल्या व्यक्तीने बांधकाम परवानगीची फाईल दिली नाही म्हणून त्याच्या कामात त्रुटी काढून त्याचे बांधकाम बंद पाडण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी तेथे भेट दिल्याचे लोकांच्या चर्चेतून समोर आले आहे. मात्र जी किरकोळ बांधकामे हे अधिकारी थांबवायला आली होती त्यांना केडगाव परिसरामध्ये परवानगी न घेता जी शेकडो बांधकामे सुरु आहेत ती का दिसली नाहीत असाही सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
काही ठराविक बांधकामे दाखवून त्यांच्याकडून फाईल मंजुरीच्या नावाखाली बक्कळ पैसा उकळण्याचे कारस्थान येथील एका ‘गब्बर’ दलालाने केले असल्याची चर्चा सध्या संपूर्ण केडगाव परिसरात होत आहे. त्यामुळे आता सरकारी कार्यालयांमध्ये शेती ‘एनए’ असो किंवा बांधकाम मंजुरीचे टीपी, पीएमआरडीए चे कोणतेही काम असो या ठिकाणी एजंट आणि दलालांना येण्यास सक्त मनाई करण्यात यावी आणि नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवली जावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. क्रमशा…
भाग 3 मध्ये वाचा… दलाल आणि अधिकारी कसे आले होते पोलिसांच्या जाळ्यात आणि कुणावर कुठे झाली होती कारवाई…