‘बाप्पाचे’ वाजतगाजत उत्साहाच्या वातावरणात आगमन, घरगूती तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती झाल्या विराजमान

सुधीर गोखले

सांगली : गेल्या काही दिवसांपासून वेध लागलेल्या गणेशोत्सवास आज सुरुवात झाली. काल सायंकाळ पासून घराघरांमधून हरितालिकाचे आगमन झाले. त्याचबरोबर बहुतांश घरी काल सायंकाळी घरगुती श्री गणेश मूर्ती ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात आणल्या गेल्या तर आज काही घरगुती गणपती आणि बहुतांशी सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्ती सवाद्य मिरवणुकीने थाटामाटात विराजमान झाल्या.

सांगली, मिरजेतील बाजारपेठ आज गणेशभक्तांनी फुलून गेली होती. हार, नारळ, फुले, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्याबरोबर श्री गणेश मुर्त्यांची खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडालेली होती. बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर वरुणराजाने काल पासून सर्वत्र हजेरी लावली त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. आज सकाळपासून शहरामध्ये रिमझिम पाऊस सुरूच होता त्यामुळे काही मंडळींनी घरगुती गणपती आपल्या चारचाकी वाहनातून नेले तर काहींनी रिक्षा मधून नेणे पसंद केले पावसामुळे रस्त्यावर मात्र चारचाकी गाड्या आणि रिक्षांची गर्दी पाहायला मिळाली.

मिरज तालुक्यामधून ६५० गणराय झाले विराजमान
आज पासून सुरु झालेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी चोख बंदोबस्त तैनात केला असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे तर आज मिरज तालुक्यात तब्बल ६५० गणराय विराजमान झाले आहेत यामध्ये मिरज शहर पोलीस ठाण्यांतर्गत २९५ सार्वजनिक मंडळांनी नोंद केली असून, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे अंतर्गत ११५ तर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत २५० मंडळे नोंदली गेली आहेत.

विद्युत रोषणाई आणि मूर्तीच्या उंचीवर भर
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्रामुख्याने उंचच्या उंच मूर्ती वेगवेगळ्या देखाव्यासह मंडळांनी आणल्या आहेत किमान ५ फुटपासून ३० फुटापर्यंत मूर्तीची उंची आहे तर काही ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा पाहायला मिळणार आहे.
महापालिका प्रशासन सज्ज
यंदाच्या गणेशोत्सवासाठी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका सज्ज असून श्रींच्या आगमनासाठी सर्वतोपरी तयारी मनपा प्रशासनाने केल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सहकारनामा शी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या कि, मिरवणूक मार्गात अडथळा असणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटल्या असून रस्त्यावरील बंद विद्युत दिवे सुरु करण्यात आले आहेत विद्युत वाहिन्या व्यवस्थित करून घेण्यात आल्या आहेत रस्त्यावर असलेले खड्डडे बहुतांशी भरून घेतले आहेत तर विसर्जन कुंडाची सोय हि तिन्ही शहरांमध्ये विविध ठिकाणी केली गेली आहे त्याचबरोबर श्री गणेश मूर्ती दान उपक्रम यावर्षीही आम्ही राबवत आहोत तसेच पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तीसाठी जनजागृतीही आम्ही केली आहे. मंडळाच्या नोंदी आम्ही यावेळी अनिवार्य केल्या आहेत तर यंदाच्या वर्षी रस्ते नवीन असल्यामुळे रस्तेकर हि आम्ही घेत आहोत.

सांगली संस्थानच्या ‘श्रीं’चे आगमन आणि प्रतिष्ठापना
सांगली संस्थानच्या श्रींच्या मूर्तीचे आगमनआणि प्रतिष्ठापना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास झाली जुन्या जिल्हाधिकार्यालयाच्या आवारातील ऐतिहासिक दरबार हॉल येथे श्री गणरायाचे आगमन आणि प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी अधिपती श्री विजयसिंहराजे पटवर्धन सपत्नीक उपस्थित होते.
गणेशोत्सवासाठी शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त
यंदाच्या श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद हा सण येत असून त्या दृष्टीने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आम्ही सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले तर सोशल मीडिया वर च्या पोस्ट वर आमचे सायबर खाते बारीक लक्ष ठेऊन आहे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये असेही आवाहन ज्या सार्वजनिक मंडळांनी नोंदणी केली नसेल तर ती त्यांनी त्वरित करून घ्यावी अन्यथा आम्ही कारवाई करू असेही त्यांनी सांगितले. आम्ही रेकॉर्ड वरील दोनशे गुन्हेगारांना उत्सव काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नोटीस दिल्या असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले तसेच बावीस पेक्षा जास्त गंभीर गुन्हे असलेल्याना आम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत तडीपार केले असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्युत वितरण कंपनी ऍक्शन मोड मध्ये
यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोठेही विद्युत प्रवाह खंडित होऊ नये सणावर विद्युत खंडित होण्याचे सावट निर्माण होऊ नये यासाठी मिरज शहरातील विद्युत वितरण कंपनीचे अति अभियंता भालचंद्र तिळवे आपल्या टीम सह सर्व भागात लक्ष देऊन आहेत विशेष करून मिरवणूक मार्गावरील विद्युत पुरवठा सुरळीत सुरु रहावा नागरिकांचा रोष उद्भवू नये यासाठी ते विशेष परिश्रम घेत आहेत.