स्वामी विवेकानंद शाळेतील माजी विध्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात ‘मैत्री’ चे दर्शन | शालेय मैत्रीण अडचणीत असल्याचे समजताच तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी मित्रांचा आर्थिक हातभार

संपादकीय विभाग – अब्बास शेख

ये दोस्ती हम नही छोडेंगे, तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे… शोले चित्रपटातील हे गाणे जवळपास सर्वांनाच पाठ आहे. मात्र हे गाणे गाताना ते नुसते मनोरंजनासाठी नसून त्याचा अर्थ आणि जबाबदारी हा खूप मोठी आहे हे विसरता कामा नये. त्यामुळेच म्हणतात ना, ज्यावेळी मित्र, सखा, दोस्त अडचणीत असेल त्यावेळी त्याने न सांगता, न मागता त्याची गरज ओळखून त्या मित्राची मदत करणे यासारखे दुसरे पुंण्याचे काम काय असू शकते..! असाच काहीसा प्रत्यय एका मैत्रिणीला आला असून माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यातील कार्यक्रमात अचानक मित्रांकडून झालेल्या मदतीमुळे या माजी विद्यार्थी मैत्रिणीचे डोळे मात्र पाणावले आणि मित्र काय असतात याची प्रचितीही तिला आणि उपस्थितांना आली.

झाले असे की, दौंड तालुक्यातील केडगाव (आंबेगाव पुनर्वसन) गावातील जय भवानी शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांकडून 17 सप्टेंबर रोजी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्यात सन 2006 ते 2007 साली 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या जवळपास 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्वखर्चातून हा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी खुर्च्या आणि प्रयोग शाळेतील साहित्य दिले. त्याच वेळी आपली एक शालेय मैत्रीण जिला दोन मुले आहेत आणि तिच्या पतीचे अल्पशा आजाराने अचानक दुःखद निधन झाले आहे मात्र ती डगमगली नाही. आणि ती आजही आपल्या दोन मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी तिची धडपड सुरु असल्याची बाब तिच्या विद्यार्थी, विध्यार्थिनी मित्रांना समजली. आणि या सर्व मित्रांनी स्नेह मेळाव्याचे औचित्य साधून आपल्या मैत्रिणीला न समजता आणि तिचा स्वाभिमान दुखवला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेत तिच्या दोन मुलांच्या शालेय शिक्षणासाठी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत तिच्या बँक खात्यावर जमा केली. मुलांच्या शालेय शिक्षणासाठी आपले शालेय मित्र आपल्या कामी आल्याचे पाहून या माजी विध्यार्थिनीच्या डोळ्यात मात्र अश्रुं दाटून आल्याचे दिसले.

एकंदरीत या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा खूप आनंदात आणि शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत संपन्न झाला. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारीवर्गाने आवर्जून हजेरी लावली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी सारीका गायकवाड-बारवकर हिने केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि कार्यवाहकांची जबाबदारी रुपाली जांभूळकर-गिरमे, धनाजी शेळके, राहुल इनामदार, अमोल चव्हाण यांनी उत्तमरित्या पार पाडली .

या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. तर या स्नेह मेळाव्याचे अध्यक्षपद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा जाधव मॅडम यांनी भूषविले. अमोल चव्हाण यांनी अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव सुचविल्यानंतर त्यास राहुल इनामदार यांनी सर्वानुमत अनुमोदन देत अध्यक्षांचे व्यासपीठावर स्वागत केले. यावेळी विद्यालयाचा शिक्षकवर्ग रत्ना वाबळे मॅडम, सुनील माने सर, सुभाष थरकार सर, संजय पाटील सर, हेमंत केंजळे सर, जालिंदर दिवेकर सर, किसन बागल सर, सुनील शितोळे सर, उत्तम बरकडे सर, थरकार मॅडम, सुनील काळभोर सर आणि वाळके सर अशा सर्व मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमावेळी सर्व विद्यार्थिनींकडून मान्यवरांना औक्षण करण्यात येऊन शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे व्यासपीठावर स्वागत करण्यात आले. हा मेळावा सुनिल माने सर तसेच हेमंत केंजळे सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पार पडला.