दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या सिद्धेश कदम विरोधात गुन्हा दाखल, समाजकंटकांना दौंड पोलिसांचा इशारा

अख्तर काझी

दौंड : दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकून शहराची कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवका विरोधात दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सिद्धेश कदम (रा. दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

गणेशोत्सव व पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यातच दौंड पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी, हे दोन्ही उत्सव दौंडकरांनी एकत्रित येऊन आनंदाने साजरे करावेत व शहरात भाईचारा, जातीय सलोखा अबाधित ठेवण्याची शहराची परंपरा कायम राखावी असे आवाहन केले होते.

तसेच उत्सवादरम्यान जर कोणाकडून एखादी धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली तर अशा व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही स्वप्निल जाधव यांनी यावेळी दिला होता. त्या अनुषंगाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी अवमानकारक पोस्ट टाकणाऱ्या दौंड मधील सिद्धेश कदम याच्या विरोधात दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून समाजकंटकांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.

दि. 19 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे, आणि 28 सप्टेंबर रोजी गणेश बाप्पांचे विसर्जन आहे. योगायोगाने त्याच दिवशी(28 सप्टेंबर) पैगंबर जयंती सुद्धा आहे. मात्र बाप्पांच्या विसर्जन दिवशी पैगंबर जयंती साजरी न करता ती दुसऱ्या दिवशी दि. 29 सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा एक चांगला निर्णय येथील समस्त मुस्लिम बांधवांनी एकमताने घेऊन शहरात जातीय सलोखा अबाधित ठेवणार असल्याचे दाखवून दिले आहे.

असे असताना काही समाजकंटकांकडून शहराची कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न होतो आहे, त्यांची संख्या मोठी नाही त्यामुळे येथील सर्व समाजातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दक्ष राहून अशा समाजकंटकांच्या कृत्यांकडे व हालचालींवर करडी नजर ठेवून अशांची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावयाची आहे. वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या बरोबर आपण वाद न घालता त्याची माहिती पोलिसांना द्यावयाची आहे. शहरातील कायदा सुव्यवस्थेशी खेळ करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाईचा इशारा दौंड पोलीस प्रशासनाने दिला आहे.