Big News : केडगावच्या ‛त्या’ कोविड सेंटरमध्ये 4 कोरोना बाधितांचा मृत्यू, नातेवाईकांनी रुग्णालयावर केला हलगर्जीपणाचा आरोप तर डॉक्टरांनी दिले ‛हे’ कारण, तहसीलदारांकडून चौकशीचे आदेश



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे असलेल्या मोहन जनरल हॉस्पिटल या कोविड सेंटरमध्ये आज चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यातील एका रुग्णाचा मृत्यू हा पहाटेच्या सुमारास झाला तर इतर तीन रुग्णांचे मृत्यू दुपार नंतर झाल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे. 

तीन रुग्णांचा मृत्यू हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचा आरोप मृत रुग्णांच्या नातेवाईकांनी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता त्यामुळे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

यावेळी दौंडचे तहसीलदार संजय पाटील, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस उप निरीक्षक गंपले यांनी रुग्णालयाला भेट देत नातेवाईकांना शांत राहण्याचे आवाहन केले. आणि सदर प्रकरणाची चौकशी होऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल असा विश्वास मृतांच्या नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. 

यावेळी मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज देऊन रुग्णालयावर हलगर्जीपणा आणि ऑक्सिजन संपल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. 

तर हे मृत्यू व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनच्या कमी पुरवठ्यामुळे झाले असल्याची माहिती या कोविड सेंटरचे संचालक डॉ.धिरेंद्र मोहन यांनी  भ्रमण ध्वनिवरून दिली.

याबाबत दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी बोलताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील बिलाच्या तक्रारी आमच्याकडे केलेल्या होत्या त्याबाबत संबंधित कोविड सेंटर चालकांना 26 एप्रिल रोजी नोटीस काढली आहे. तसेच आज घडलेल्या प्रकाराबाबत माननीय प्रांत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती नेमून त्यावर रीतसर अहवाल आल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.