दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड च्या सहजपूर फाट्याजवळ भीषण अपघात होऊन यात तीन वाहने जळून खाक झाली आहेत. या वाहनांमध्ये ट्रक, टेम्पो आणि कार चा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सहजापूर फाट्याजवळ असणाऱ्या पंजाबी ढाब्यासमोर एक ट्रेलर उभा होता. त्यावेळी केमिकल्सने भरलेल्या आयशर टेम्पोने उभ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे स्फोट होऊन आयशर टेम्पोने पेट घेतला. त्यानंतर ट्रेलरनेही पेट घेतला. वाहनांतील ड्रायव्हर लोकांनी वेळीच बाहेर काढले म्हणून त्यांच प्राण वाचले.
मात्र आयशर टेम्पोतील केमिकलने पेट घेतल्याने त्यातील गरम झालेले केमिकल रस्त्यावर, आजूबाजूला पडू लागले त्यामुळेच पंजाबी ढाब्यावर उभ्या असलेल्या तिसऱ्या गाडीनेही पेट घेतला. यावेळी सहजपूरचे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मोलाची मदत झाली.
आग आटोक्यात आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब आल्याने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. यावेळी वाघोली येथील पी.एम.आर.डी.ए अग्निशमन दलाची गाडी आल्याने आग आटोक्यात आणली गेली. धाब्यांवर लावण्यात येत असलेल्या वाहणांमुळे अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.