दौंड मधील शिक्षण संस्था अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, दौंड पोलीस स्टेशन समोर महिलांचे आमरण उपोषण

अख्तर काझी

दौंड : दौंड येथील एका शिक्षण संस्थेतील शाळेच्या वसतीगृहामध्ये स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या महिलांनी दौंड पोलीस स्टेशन आवारामध्ये आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संस्थेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला आमच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवले, सार्वजनिक ठिकाणी अपमानित करत जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देऊन कामाचा राजीनामा मागितला असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.

शिक्षण संस्था अध्यक्षांनी केलेल्या या कृतीच्या निषेधार्थ आम्ही आमरण उपोषण करीत आहोत अशा आशयाचे निवेदन आंदोलकांनी दौंड पोलिसांना दिले आहे. सुनिता बाबासाहेब लोंढे, कविता भाऊसाहेब डाळिंबे, शालिनी दीपक चंद्रमोरे व सायरा नजीर शेख या महिलांनी आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे.

आंदोलकांनी निवेदनात असे नमूद केले आहे की, आम्ही सन 2004 सालापासून शासन निर्णयानुसार सदर संस्थेतील शाळेत स्वयंपाक करण्यासाठी कर्मचारी म्हणून काम करीत असताना, या संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी आम्ही मागासवर्गीय महिला आहोत हे माहीत असतानाही शासनाचे निर्णय व परिपत्रक धाब्यावर ठेवून आमच्याकडून काबाड कष्ट करून घेतले व स्वतःच्या मनाप्रमाणे पगार दिला. अनेक वर्षापासून अध्यक्ष व इतरांनी आम्हाला न्याय हक्कापासून वंचित ठेवले, जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देऊन कामाचा राजीनामा मागित आहेत. आमच्यापैकी एकीला मनाला लज्जा उत्पन्न होईल अशी शिवीगाळ करीत त्यांना शाळेच्या गेट बाहेर हाकलून देण्यात आले. त्यांच्या या कृत्यामुळे अध्यक्ष व त्यांचे सहकारी यांच्यावर ॲट्रॉसिटी कलमान्वये कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

याबाबत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना या प्रकरणाविषयी व त्यांच्यावरील आरोपांविषयी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, सदरचे प्रकरण जसे सांगितले जाते तसे बिलकुल नाही. माझ्या आरोपावरील सविस्तर प्रतिक्रिया आपण नंतर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.