यवत येथील गुळ व्यापाऱ्याची 6 लाखांची फसवणूक

दौंड / यवत : दौंड तालुक्यातील विविध शेतकऱ्यांना ऊसतोड कामगार तसेच गुऱ्हाळ चालकांनी गंडा घातल्याच्या घटना समोर येत होत्या मात्र आता गुऱ्हाळ चालक आणि दुकानदारांची सुद्धा फसवणूक केली जात असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

अशीच एक घटना यवत येथे घडली असून साईश्रद्धा गुळ उद्योग चे मालक निलेश विरसेन जैन यांची दिपक जुगल किशोर अग्रवाल आणि महेंद्र प्रविणकुमार भन्साळी यांनी फसवणूक केली असल्याची फिर्याद निलेश जैन यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील दोन्ही आरोपींनी संगनमत करून त्यांच्याकडे दोन वाहने पाठवुन दिली आणि त्यामध्ये ५ लाख ९७ हजार ८७१ रुवयांचा २० टन ९८५ किलो गुळ घेऊन गेले.

आरोपीने हा माल उमेश ट्रेडींग कंपनी घोटी येथील गोडावुन मध्ये उतरवुन पैसे पाठवितो असे फिर्यादी यांना विश्वासात घेवुन सांगितले मात्र त्यांना पैसे न दिल्याने फिर्यादी यांनी त्या ठिकाणी गेले असता आरोपींनी त्यांना चेक देऊन थोडे दिवसात पैसे देतो असे सांगुन त्यांना परत पाठविले. मात्र त्यांना त्या चेकवर पैसे उपलब्ध न झाल्याने त्यांनी वेळोवेळी फोन केले असता त्यांनी पैसे न देता टाळाटाळ करीत राहिले. त्यामुळे आपला विश्वासघात करून फसवणुक करण्यात आली असल्याची खात्री फिर्यादी यांना झाली आणि त्यांनी अखेर वरील आरोपींविरोधात फिर्याद दिली आहे. अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.