निरा देवघर 100 टक्के भरले, नागरिकांना सावधानतेचा ईशारा

निरा : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी काही ठिकाणची धरणे भरली असल्याने समाधान व्यक्त होत आहे. पुणे जिल्ह्यातील असेच एक निरा देवघर हे धरण पूर्ण क्षमतेने म्हणजेच 100 टक्के भरले असून यामुळे नदी पात्रात जाणाऱ्यांसाठी सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे.

सध्या निरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने निरा देवघर धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरले आहे. त्यामुळे विद्युतगृहद्वारे नदी पात्रामध्ये सुरू असणाऱ्या ७५० क्युसेक विसर्गात वाढ करुन धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये ५९० क्यूसेक व विद्युतगृहद्वारे ७५० क्यूसेक असे एकूण १३४० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे.

पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी/अधिक बदल केला जाऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत असे आवाहन यो. स. भंडलकर, सहाय्यक अभियंता (श्रेणी १, निरा पाटबंधारे उपविभाग, निरा ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी केले आहे.