दौंडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, विशाल पोळ याची पोलीस उप निरीक्षकपदी निवड

अख्तर काझी

दौंड : दौंड मधील भीमथडी शिक्षण संस्थेतील शे .जो .विद्यालयाचा विद्यार्थी विशाल ईश्वर पोळ याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. विशाल याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड करण्यात आली आहे.

दौंड शहरालगत असलेल्या देऊळगाव राजे गावातील शेतकरी कुटुंबातील विशाल 2018 पासून या परीक्षेची तयारी करीत होता. रोज नियमित 10 ते 12 तास अभ्यास करीत 2020 साली घेण्यात आलेल्या एम पी एस सी परीक्षेत विशालने यश मिळविले. येथील शे.जो. विद्यालयामध्ये इ. 12 वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने इंजीनियरिंग (ENTC) चे शिक्षण पूर्ण केले आहे. दोन वर्षाच्या सततच्या प्रयत्नानंतर अखेर मला यश मिळाले असे तो सांगतो.

विशाल खेळांच्या स्पर्धेतही भाग घेत होता. खेळामुळे एकाग्रता राखण्यासाठी खूप मदत मिळाली, प्रत्येक विद्यार्थ्याने अपयशाला खचून न जाता आपले प्रयत्न चालू ठेवले तर निश्चित यश मिळते असेही विशाल म्हणाला. विशाल पुढील प्रशिक्षणासाठी नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे लवकरच रवाना होणार आहे. शिक्षण संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते विशाल याचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल याचे मार्गदर्शक व क्रीडा शिक्षक माधव बागल व त्याचे जिवलग मित्र उपस्थित होते.