| सहकारनामा |
पुणे : नुकत्याच झालेल्या एका महिलेच्या खूनातून सुमारे दीड वर्षापूर्वी एका जेष्ठाच्या झालेल्या खुनाची उकल करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. केवळ एका नावाच्या आधारे तपास करून खुन्यापर्यंत पोहोचण्याची किमया हडपसर पोलिसांनी केली आहे.
संतोष सहदेव शिंदे (वय 27, रा. फुरसुंगी, मूळ- चाकूर, लातूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने नरसिंग विठ्ठल गव्हाणे (वय 65, रा. फुरसुंगी) या वृद्धाचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
हडपसर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.7 एप्रिल रोजी एका महिलेचा खून झाला होता हा खून तिच्या पतीनेच केला असल्याचे आणि त्या महिलेच्या पहिल्या पतीसोबत ती बोलत असल्याच्या रागातून करण्यात आल्याचे समोर आले होते.
याप्रकरणी पोलिसांनी सागर बाळू लोखंडे या आरोपीस अटक केली होती. या खूनाच्या तपासावेळी महिलेचा दुसरा पती असलेल्या सागरने पोलिसांना माहिती देताना सांगितले की एक वर्षापुर्वी शुभांगी लोखंडे हिच्यासोबत त्याने लग्न केले होते. लग्न झाल्यानंतरही शुभांगी हि तीच्या पहिल्या नवऱ्यासोबत बोलत असायची त्यामुळे सागर आणि तिच्यामध्ये कायम भांडण होत असायचे.
भांडणात शुभांगी हिने माझ्या पहिल्या नवऱ्याने मर्डर केला असून तु जर जास्त नाटक केले आणि आमच्या मध्ये आला तर तुझाही तो मर्डर करेल अशी धमकी तिने सागरला दिली होती. हि माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळताच पोलिसांनी या घटनेचा मागमूस काढण्यास सुरुवात केली आणि रहस्यमई खूनाचे वास्तव समोर आले..
दीड वर्षांपूर्वीच्या त्या जेष्ठाचा असा झाला होता खून
सुमारे दीड वर्षापुर्वी फुरसुंगीतील एका जेष्ठ इसमाचा खून झाला होता मात्र त्या खूनाची उकल मात्र होत नव्हती. हा जेष्ठ आणि संतोष यांच्यामध्ये नेमके काय कनेक्शन असेल यावरून हडपसर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आणि अगोदर संतोष यास हा चिखलीतून ताब्यात घेतले. यावेळी त्याने चौकशीत त्या जेष्ठाच्या खुनाची कबुली दिली.
संतोष याने माहिती देताना तो दारू पिण्यासाठी कायम फुरसुंगी येथील दशक्रिया घाटावर जात होता मात्र तेथे दारू पिण्यासाठी आणि गांजा ओढण्यासाठी येणारा जेष्ठ इसम नरसिंग गव्हाणे यास त्याचे तेथे येणे पटत नव्हते त्यामुळे नरसिंग गव्हाणे हे त्यास शिवीगाळ करून मारहाण करत असायचे. या गोष्टीचा राग अनावर होऊन संतोष याने दि. 29 डिसेंबर 2019 च्या रात्री साधारण 8:30 वाजण्याच्या सुमारास नरसिंग हे गांजा ओढत असताना त्यांना दगड, विटांनी मारहाण करून खून केला असल्याचे सांगितले आणि अशा प्रकारे एका खूनातून दोन खूनांची उकल करण्यात हडपसर पोलिसांना यश आले.
वरील कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षीरसागर, सैदोबा भोजराव, संदीप राठोड, समीर पांडुळे, अविनाश गोसावी, शशिकांत नाळे, शाहिद शेख, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, राहुल मद्देल यांच्या पथकाने मोठे परिश्रम घेत केली आहे.