| सहकारनामा |
दौंड : (अख्तर काझी)
संचार बंदी काळातही आपली दुकाने सुरू ठेवणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर दौंड पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाईमध्ये शहरातील आंबेडकर चौक येथील प्रकाश वूलन्स व दीपमळा परिसरातील एक सुपर मार्केट सील करण्यात आले आहे. तहसीलदार संजय पाटील यांच्या आदेशाने सदरची दुकाने सील करण्यात आली असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.
दौंड पोलिसांनी याबाबत अधिकची दिलेली माहिती अशी, संचार बंदी काळात अत्यावश्यक सेवेतील दुकानांना फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेतच दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी असताना दीपमळा परिसरातील सुपर मार्केट या वेळे नंतरही सुरू ठेवले जात होते, याची माहिती उपअधिक्षक मयूर भुजबळ यांना मिळाल्यानंतर दिनांक 2 मे रोजी रात्री 8.30 वा. च्या दरम्यान स्वतः भुजबळ साध्या वेषात या सुपर मार्केट मध्ये खरेदीच्या बहाण्याने गेले असता ते चालू होते.
सदरची माहिती तहसीलदारांना देण्यात आली असता त्यांनी सुपर मार्केट सील करण्याचे आदेश दिल्याने 15 दिवसांसाठी सुपर मार्केट सील करण्यात आले आहे.आंबेडकर चौक येथील प्रकाश वूलन्स हे कापडाचे दुकान अत्यावश्यक सेवेत येत नसतानाही ते चालू होते.दि.3 मे रोजी हे दुकानही पोलिसांनी एक महिन्यासाठी सील केले आहे.
उप. अधीक्षक मयूर भुजबळ, सहा. पो. निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस कर्मचारी वलेकर, बोराडे, देशमुख, भाकरे,शिंदे, चव्हाण या पथकाने कारवाई केली.