बारामती : पेट्रोल पंपाची कॅश घेऊन ती बँकेत भरण्यास जात असलेल्या कर्मचाऱ्यास भर रस्त्यात पिस्तूलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या कर्मचाऱ्याला यावेळी जबर मारहान करून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या टोळीला बारामती शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण कडून २४ तासात जेरबंद करण्यात यश आले असून या टोळीत पेट्रोल पंपावरील एक कर्मचारीही सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०७.०८.२०२३ रोजी बारामती शहराजवळ पाटस रोडलगत असणाऱ्या कृष्णा पेट्रोलीयम या पेट्रोलपंपावरील दोन दिवसाची कॅश घेवून मॅनेजर मयूर बाळासाहेब शिंदे हे दिनांक ०७ ऑगस्ट रोजी १२.०० च्या सुमारास बारामती सहकारी बँकेत भरणा करण्यासाठी कॅश घेवून जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दोन अनोळखी इसम तोंडाला मास्क लावून स्प्लेंडर मोटार सायकलवर आले व त्यांनी शिंदे यांचे मोटार सायकलला त्यांची मोटार सायकल आडवी मारून त्यांना थांबवले व त्यांचेकडील १ लाख ९९ हजार रूपये असलेली बॅग हिसकावू लागले त्यास मॅनेजर शिंदे यांनी प्रतिकार करून ती बॅग देण्यास नकार दिला.
त्यावेळी त्या दोन अज्ञात चोरटयांनी शिंदे यांना मारहान केली व त्यांचेकडील असलेले पिस्तूल त्यांनी काढून ते मुठीच्या बाजूने शिंदे यांचे डोक्यात मारून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला परंतु शिंदे यांनी ती बॅग सोडली नाही. त्यावेळी रोडने जाणारे येनारे लोक थांबू लागल्याने ते दोन चोरटे पुन्हा पाटस बाजूकडे पळून गेले. ही बातमी हि पोलीसांना समजताच बारामती शहर पोलीस स्टेशनकडील पोलीस हे सदर घटनास्थळी गेले व जखमी मॅनेजर शिंदे यांची विचारपूस करून जखमीला औषधोपचार कामी सरकारी दवाखाण्यात पाठविण्यात आले होते.
हे गंभीर प्रकरण असल्याने अंकित गोयल (पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), अपर
पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी यात जातीने लक्ष देऊन पुढील तपासाबाबत योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले व तात्काळ विना विलंब तपासाची चक्रे वेगाने सूरू झाली. या गुन्हयाचे घटनेचे गांर्भीय ओळखून आनंद भोईटे (अपर पोलीस अधिक्षक बारामती) व
गणेश इंगळे (उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती), स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी भेट देवून तपासकामी मार्गदर्शन केले.
त्यानंतर सदर गुन्हयाचे तपासात बारामती शहर, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, बारामती तालूका, भिगवण, माळेगाव, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन या मार्फत तपास सुरू करून तपासाच्या वेगवेगळया टीम तयार करून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू झाला व गोपनिय बातमीदार व तांत्रीक विश्लेषनाच्या आधारे काही तासातच सदर गुन्हा उघडकीस आला व सदरचा गुन्हा हा सदर पेट्रोलपंपावरील एक कामगार अक्षय धांईजे व त्याचे इतर दोन साथीदार यांनी संगनमत करून सदरचा गुन्हा केला असल्याचे तांत्रीक विश्लेषन व गोपनीय माहितीवरून निष्पन्न करण्यात पोलीसांना यश आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेले हत्यार, वाहन व इतर मुददेमाल जप्त करण्यात आला असून इतर आरोपी यांचा गुन्हयात सहभाग आहे काय याचा तपास सुरू आहे.