अब्बास शेख
दौंड : चिपळूण तालुक्याच्या ओमळी येथील कु. निलीमा सुधाकर चव्हाण हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून करणाऱ्या नराधमाला तात्काळ अटक करावी अशी मागणी दौंड तालुक्यातील समस्त नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन दौंड तहसीलदार सो, दौंड पोलीस निरीक्षक आणि यवत पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.
ओमळी येथील कुमारी निलीमा चव्हाण ही दापोली येथील स्टेट बँकेमध्ये कंत्राटी पद्धतीवर कामाला होती. ती दि. २९ जुलै
रोजी कामावरून घरी परत येत असताना तिचे अपहरण करण्यात येऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. त्यानंतर तिचा मृतदेह दि. १ ऑगस्ट रोजी दाभोळ खाडी मध्ये आढळुन आला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
निलिमा ही नाभिक समाजातील अत्यंत
गरीब कुटूंबातील होती. तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्यांना तात्काळ
अटक करावी अन्यथा नाभिक समाज संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा या संघटनेकडून देण्यात आला आहे.
निलिमा चव्हाण हत्या की आत्महत्या… पोलिसांचा कसून शोध सुरू
दरम्यान, नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून जगबुडी नदी परिसरात बोटी आणि ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने तिची बॅग आणि मोबाइलचा शोध घेतला जात आहे. नीलिमा चव्हाण बेपत्ता होण्याच्या एक-दोन दिवस अगोदर तिने आपल्याला जगायचे नाही, अशा स्वरूपाचे निराशाजनक व्हाट्सअप चाट केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या संपूर्ण विषयात वरिष्ठ पोलीस अधिकारी नीलिमा चव्हाण हीच्या नातेवाईकांजवळ चर्चा करून तपासाची माहिती देणार असल्याचे समजते. निलिमाचा मृतदेह खाडीत आढळल्यानंतर तिच्या डोक्याचे आणि भुवयांचे केस नव्हते त्यामुळे तिच्या खुनाचा संशय बळावला होता.
त्यामुळे नीलिमा चव्हाण प्रकरणात शंभर पेक्षा जास्त जणांची चौकशी करण्यात आली. नीलिमाच्या मृत्यू प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल पोलिसांकडे आल्याची माहिती मिळत असून याबाबतची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून चव्हाण कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना दिली जाणार आहे. त्यामुळे नीलिमाची बॅग आणि मोबाइल या दोन महत्त्वाच्या वस्तू मिळवण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नीलिमा चव्हाण ही जुन्या बंद असलेल्या भोस्ते पुलावरून चालत गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे. बॅग ठेवल्यानंतर नीलिमा चव्हाण नेमकी कुणीकडे गायब झाली? याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.