दौंड | शिरापूर येथे बिबट्याचा वावर ! बोकड आणि शेळीचा पाडला फडशा

राहुल अवचर

देऊळगाव राजे : दौंड तालुक्यातील शिरापूर येथे बिबट्याचा वावर असल्याचे निषपन्न झाले असून बिबट्याने शेळी आणि बोकडावर हल्ला करत त्यांचा फडशा पाडला असल्याचे दिसत आहे. मात्र अजूनही या बिबट्याचे कुणाला दर्शन झाले नसले तरी त्याच्या पायाचे ठशे आणि त्याने शिकार केलेल्या भक्षकाचे काही अवयव सापडल्यामुळे परिसरात घबराट पसरल्याचे पहायला मिळत आहे.

शिरापूर येथील गणेशनगरचे शेतकरी सुभाष होलम यांची शेळी व बोकडाचा बिबट्याने दोन दिवसांपूर्वी फडशा पाडला आहे. ज्या ठिकाणी बिबट्याने शेळी आणि बोकडाची शिकार करून त्यांना खाल्ले त्या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठशे तेथे उमटले आहेत. या सर्व प्रकारामुळे शिरापूर आणि परिसरातील शेतकरी भीतीच्या छायेखाली आहेत. या बिबट्याचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी येथील शेतकरी वर्गाकडून होत आहे.

शिरापूरमध्ये वनविभागाचे मोठे क्षेत्र आहे त्यामध्ये पूर्ण काटेरी झाडे झुडपे असल्यामुळे येथे विविध प्राण्यांचे वास्तव्य आहे. मात्र बिबट्या सदृश प्राणी प्रथमच या ठिकाणी आल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून शेती आणि शेतकऱ्यांची घरे ही वन क्षेत्राने वेढलेली असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

शिरापूर येथे बिबट्याचा वावर असून ज्या ठिकाणी बिबट्या दिसेल त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून तेथील नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहे तसेच या ठिकाणी बिबट्या असल्याचे वरिष्ठांना कळविण्यात येणार आहे.

निखिल गुंड, वनरक्षक