दौंड मधील मातंग समाजाला दफनभूमीसाठी मिळाली हक्काची जागा

अख्तर काझी

दौंड : मागील कित्येक वर्षापासून येथील मातंग समाजाच्या दफनभूमीसाठी जागा मिळविण्याचा प्रश्न प्रलंबित होता. येथील रमापती कन्नड समाजाच्या वतीने दफनभूमीसाठी हक्काची जागा मिळावी म्हणून मोठे प्रयत्न करण्यात येत होते. अखेर त्यांना या कामामध्ये यश मिळाले आहे. दौंड -पुरंदरचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांच्या आदेशाने, दौंड नगरपालिका हद्दीतील स्मशान भूमी क्षेत्रातील 0.20आर जागा मातंग समाजातील दफनभूमीसाठी मंजूर करण्यात आली आहे.

दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले व मा.नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते या आदेशाची प्रत रमापती कन्नड समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी समाजाचे अध्यक्ष,मा. उपनगराध्यक्ष सूर्यकांत येरमाळे, धरम बनसोडे, पांडुरंग गडेकर, अमर जोगदंड, गणेश ससाणे, मीरा म्हेत्रे ,तम्मा पालीम, शिव संदिपान, भुजंग बनसोडे, अशोक भंडारी, बाबू म्हेत्रे आदी उपस्थित होते. आदेशाच्या दि. पासून प्रस्तुतची जागा दौंड नगरपालिका यांच्याकडे वर्ग करण्यात येत आहे, त्याप्रमाणे अधिकार अभिलेखात नोंदी घेण्यात याव्यात. दौंड नगरपालिका यांनी प्रस्तुत जागेची मोजणी भूमी अभिलेख( उपाधीक्षक) दौंड, यांचे कडून करून घेऊन त्यास कुंपण भिंत घालावी. सदर जागेचा वापर हा फक्त मातंग समाजातील दफन भूमीसाठी करण्यात यावा, अन्य कारणासाठी सदरच्या जागेचा वापर करता येणार नाही.

सदर जागेवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता नगरपालिकेने घ्यावी. तहसीलदार, दौंड यांनी सदर वाटप केलेल्या 0.हे 20 आर क्षेत्राची नोंद तहसील कार्यालयात ठेवण्यात आलेल्या शासकीय जमीन वाटपाच्या नोंदवहीत घेण्यात यावी अशा अटी व शर्ती आदेशामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

दौंड शहरामध्ये मातंग समाजाला दफन भूमीसाठी त्यांच्या हक्काची जागा मिळत नव्हती, समाजाला दफनभूमीसाठी हक्काची जागा मिळावी म्हणून येथील रमापती कन्नड समाज प्रयत्नशील होता. समाजाच्या वतीने नगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. त्यांच्या या प्रयत्नांना आज अखेर यश मिळाले आहे.