| सहकारनामा |
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यात झपाट्याने वाढत असल्याने पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पुण्यामध्ये ‛कडक निर्बंध’ लावण्यात येणार असल्याचे सांगितले मात्र संपूर्ण लॉकडाउन सध्यातरी लागू होणार नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले आहे. तसेच लोक काही काम नसताना घराबाहेर पडत असल्याने त्यांंच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश त्याांनी दिले.
पुण्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने येथे मागील वर्षिसारखा लॉकडाउन करावा असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले होते. याबाबत आज अजितदादा काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
अजित पवारांनी पुण्यातील आजच्या बैठकीत खरीप हंगामासाठी लागणारे बी बियाणे, खते, किटकनाशकांची उपलब्धता तसेच पीक कर्ज वाटपाबाबत त्यांनी आढावा घेतला. खरीप हंगामामध्ये बी बियाणे, खते, किटकनाशके यांची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी तसेच शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावं, एकही पात्र शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
पुणे जिल्ह्यात २ लाख १९ हजार ७०० हेक्टर क्षेत्राचे खरीप हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका, सोयाबीन यांचा समावेश आहे. शेतक-यांच्या मागणीप्रमाणे बियाणे, खते, कृषी निविष्टा यांची कमतरता भासणार नाही तसंच कृषी विभागानं बियाणे उपलब्धतेबाबत व बियाणांच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावं.
तसंच खतांच्या व बियाणांच्या संदर्भात कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले. बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांच्या उत्पादन आराखड्याची अंमलबजावणी तत्परतेनं करावी असही त्यांनी सूचित केलं.