‛अवयवदान चळवळ’ मोठ्या प्रमाणात राबवून ‛जनजागृती’ करावी – आ. राहुल कुल यांची मागणी

पावसाळी अधिवेशन 2023

मुंबई : वेगवेगळ्या व्याधींमुळे मानवी अवयव निकामी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील सुमारे ५ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू अवयव निकामी झाल्याने झाला असल्याचे निदर्शनास आले आहे.

इंग्लंड, अमेरिका, हॉंगकॉंग व जपान या देशात ज्याप्रमाणे मृत मानवी शरीर हे शासन संपत्ती जाहीर केले जाते त्याप्रमाणे आपल्याकडे देखील मृत मानवी शरीर शासन संपत्ती जाहीर करून मृत शरीरातील अवयव काढून अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतात त्यामुळे अवयवदान चळवळ मोठ्या प्रमाणात राबवून त्याचा प्रचार व प्रसार करण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार राहुल दादा कुल यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभा सभागृहात केली.

मानवी जीवनाला आणि मानवाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांकडे आमदार कुल यांनी लक्ष वेधत आज विधानसभा सभागृहात वरील प्रकारची मागणी केली. अनेकवेळा मानवाला विविध आजार, अपघातांमुळे आपला जीव गमवावा लागतो अथवा कायमचे अपंगत्व येते अश्यावेळी जर वेळीच निकामी झालेले अवयव त्या रुग्णाला मिळाले तर त्याचा जीव वाचण्यास मदत होते. त्यामुळे वरील मागणी ही मानवतेच्या दृष्टीने खूपच महत्वाची असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून येत आहे.