| सहकारनामा |
दौंड :
संपूर्ण दौंड शहराला स्वच्छता प्रदान करून दौंड करांना आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी तत्पर सेवा देणाऱ्या नगरपालिकेतील कर्मचारी व कंत्राटी कामगारांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात यावी अशी मागणी येथील नरेंद्र मोदी टीम संघटनेने केली आहे.
दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांच्याकडे याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी अमर जोगदंड, पांडुरंग गडेकर, प्रकाश पारदासानी, अविनाश गाठे, निलेश गायकवाड, साईनाथ नायकर आदि उपस्थित होते.
निवेदनात असे नमूद केले आहे की, सद्यस्थिती पाहता सदर शासकीय कर्मचारी व कंत्राटी पद्धतीतील कर्मचारी यांच्या आरोग्याची दखल शासकीय नियमावलीत अद्याप तरी दिसून आलेली नाही. आपला जीव धोक्यात घालून लोकांचे आरोग्य उत्तम रहावे म्हणून शहर साफ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे मात्र शासन दुर्लक्ष करीत आहे. अशा कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा देण्याची तरतूद गेल्या अनेक वर्षापासून राजकीय घडामोडी व परस्परांमधील मतभेदांमुळे प्रलंबितच आहे याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
दौंड नगर पालिकेतील सर्व शासकीय व कंत्राटी कामगारांना शासनाच्या नियमाप्रमाणे लवकरात लवकर मोफत आरोग्य सेवा देण्याची तजवीज करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.