Political – केडगाव ग्रामपंचायत मधील विद्यमान सदस्य ‛राजीनामा’ देणार!



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ होत असल्याचे दिसत असून सत्तेत असणाऱ्या सदस्यांच्याच वार्डमधील कामे होत नसल्याने एक विद्यमान सदस्य राजीनामा देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांच्या हवाल्याने ‛सहकारनामा’ च्या हाती लागले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केडगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्ता येण्यासाठी अनेकांनी आपापल्या परीने ताकद लावली होती. राजीनामा देणारे सदस्यांचे योगदानही यात खूप मोठे आहे. अन्यथा या ठिकाणी ‛या’ गटाची सत्ता येणे जवळपास अशक्य होते. 

मात्र सत्ता येऊनही कोणतीच कामे होत नसल्याने आणि  काहीजण ग्रामपंचायतीचा  कारभार स्वतःच्या मर्जीनुसार चालवून मुस्कटदाबी करत असल्याने हे सदस्य पुरते वैतागले आहेत. त्यामुळे लवकरच केडगाव ग्रामपंचायतीचे हे विद्यमान सदस्य आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांनी ‛सहकारनामा’ ला दिले आहे.

त्यामुळे सध्या केडगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य सोडून अजून कोणी हस्तक्षेप करत आहे का? कोण विकासकामे करण्यात अडचणी निर्माण करतंय? आणि कोण सत्तेत असणाऱ्या विद्यमान सदस्यांना दुजाभावाची वागणूक देतंय हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.