दौंड : दौंड तालुक्यातील राहू या गावात एक धक्कादायक प्रकार घडला असून या ठिकाणी भावाला भेटून यवत पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला निघालेल्या कुटुंबातील सदस्यांना गाडीवरून ओढून जबर मारहाण केल्याचा आणि हातात तलवार, कोयते घेऊन दहशत निर्माण करून फिर्यादीचा गळा दाबून बेशुद्ध पाडण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत प्रतिक सतिष कांबळे (वय 20, धंदा – ड्रायव्हर, रा. भांडगाव ,ता. दौंड जि.पुणे ) याने फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीनुसार आरोपी 1) दत्ता अशोक शिंदे 2) हणुमंत अशोक षिंदे 3) सचिन बेलदार (सर्व रा. राहु ता. दौंड जि. पुणे) यांच्यावर भा.द.वि कलम 324, 341, 504, 506, 364, 323, 34,भा.ह.का.कलम 4,25, अनु.जाती आणि अनुसुची जमाती अधिनियम कलम 3(1)(r),3(1)(s) ,3(2)(va), फौजदारी कायदा सुधारणा कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.19 जुलै रोजी 11:30 वाजण्याच्या सुमारस फिर्यादी हे त्यांचा भाऊ योगेश कांबळे याला भेटुन वृंदावणी योगेश कांबळे, काजल कांबळे, बाळासो कांबळे असे हे दोन मोटार सायकलवरून यवत येथे तक्रार देण्यासाठी जात होते. हे सर्वजण राहु येथील काळुबाई मंदीरा समोर आले असता फिर्यादी यांची मोटार सायकल आरोपी दत्ता शिंदे त्याचा भाऊ हणुमंत शिंदे व त्यांच्या हाॅटेलवर काम करणाऱ्या सचिन बेलदार यांनी अडवत फिर्यादी यांना मोटार सायकलवरून ओढुन खाली ढकलून दिले. यावेळी आरोपी दत्ता शिंदे याने हातात तलवार तर हणुमंत शिंदे आणि सचिन यांनी हातात कोयता घेऊन तो फिर्यादींना दाखवत लाथा बुक्याने मारहाण करण्यास सुरवात केली. वरील तिघांनी फिर्यादीला मारहाण करीत असताना, महाराच्या गाबडया तुला लय मस्ती आहे काय अशी शिवीगाळ केली या सर्व प्रकाराने आजु बाजुच्या लोकांमध्ये दहशत पसरून त्यांनी आपल्या घरांची दारे भितीने लावुन घेतली.
ही मारहाण सुरू असताना त्या तीन आरोपींना घाबरून फिर्यादींसोबत असलेले नातेवाईक सुद्धा भीतीने पळुन गेले. त्यानंतर दत्ता आणि हणुमंत यांनी त्यांच्याजवळील दोरीने फिर्यादीचे हात पाय बांधुन त्यास मोटार सायकलवर जबरदस्तीने बसवुन फिर्यादीला ऊसाच्या शेताजवळ घेवुन जात तेथे देखील फिर्यादीला लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्यानंतर दत्ता शिंदे याने फिर्यादीचे जर्कींग काढुन त्याच जर्किंगच्या बाहीने फिर्यादीचा गळा आवळला आणि याला जिवंत सोडायचा नाही असे म्हणुन त्यास पुन्हा उसाच्या कांडक्याने जबर मारहाण केली. फिर्यादीचा गळा जास्तवेळ आवळून धरल्याने फिर्यादी तेथेच निपचित पडले.
त्यावेळी फिर्यादीची हालचाल होत नाही हे पाहुन, मेला असेल हारामखोर असे म्हणुन आरोपी तेथुन निघुन गेले. आरोपी दत्ता शिंदे यावर या अगोदरही भोसरी येथे चोरीचा तर यवत पोलीस स्टेशन मध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 4,25, नुसार गुन्हा दाखल आहे. या घटनेत गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई व्ही.बी.कोल्हे यांनी केले असून तपासी अधिकारी म्हणून स्वप्निल जाधव (उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड)
हे काम पाहत आहेत.