RTO अ‍ॅक्शन मोडमध्ये, नियमबाह्य वाहनांवर मोठी कारवाई

सुधीर गोखले

सांगली : राज्यामध्ये वारंवार होणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेस (private travels) च्या वाढत्या अपघातामुळे सांगली उपप्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आर.टी.ओ (RTO)  कार्यालयाच्या वायुवेग पथकाकडून जोरदार मोहीम (Action) हाती घेण्यात आली आहे.

आज अचानक या पथकाने सांगली मिरजेतील काही खाजगी ट्रॅव्हल्स च्या बसेस ची झाडाझडती घेऊन कारवाईचा बडगा उचलला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत साळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक असिफ मुलाणी, रवींद्र सोळंकी, आरती देसाई, रमेश पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला. या संदर्भात अधिकारी साळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वारंवार महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना आगी लागणे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून या गाड्यांमधून काही ठिकाणी अवैध पद्धतीने नियमबाह्य वस्तूंची वाहतूक वाढल्याच्या तक्रारी या कार्यालयाकडे येत होत्या.

तसेच काही वाहनांमधून अग्निशमन उपकरणे नसणे, चालवणारी व्यक्ती मद्यपान केलेली असणे, प्राथमिक उपचार पेटी नसणे किंवा ती सुस्थितीत नसणे वेगमर्यादेंचे पालन न करणे, आपत्कालीन व्यवस्थेचा अभाव अशा अनेक त्रुटी या झाडाझडती मध्ये अधिकाऱ्यांना आढळून आल्या. त्यामुळे जवळपास पस्तीस बसेसवर कारवाई केल्याची माहिती साळे यांनी दिली. तसेच यापुढेही आम्ही व्यापक मोहीम अशा नियमबाह्य गाड्या चालवणाऱ्या बसेस विरोधात राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.