आधी होते ‛खोके’ सरकार, आता आहे ‛बोके’ सरकार – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

पावसाळी अधिवेशन- 2023

मुंबई : पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. काल सायंकाळी सत्ताधारी पक्षाने अयोजित केलेल्या चहापाणाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकल्यानंतर आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. आधी होते खोके सरकार, आता आले बोके सरकार अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधारी मंत्री, आमदारांना डीवचण्याचा प्रयत्न केल्याचे पहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट) सोबत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने हातमिळवणी केली आहे. या महायुतीचे हे आजचे पहिलेच पावसाळी अधिवेशन असून या युतीचा धागा पकडत अगोदर होते खोके सरकार आता आले बोके सरकार अशी घोषणा विरोधी पक्ष करताना येथे दिसत आहे. घोषणा देणाऱ्या या आमदारांमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांचा समावेश आहे.

घटना बाह्य कलंकित सरकार चा धिक्कार असो अश्या आशयाचे फलक यावेळी विरोधीपक्ष झळकवताना येथे दिसत आहे. पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात होत असून काल अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला यश आले नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांच्या बोलण्यातून जाणवत होते. त्यामुळे आजच्या अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमकपणे उतरण्याची शक्यता असून राज्यसरकारकडून मांडण्यात येणाऱ्या विविध प्रस्तावांवर काय परिणाम होणार आणि कश्या पद्धतीने कामकाज चालते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.