दौंड : दौंड तालुक्यातील केडगावमध्ये दोन युवकांवर तलवार आणि कोयत्याने वार करणाऱ्या आरोपींना यवत पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर आज त्यांना दौंड न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यातील चार मुख्य आरोपींना माननीय न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर या आरोपींमधील दोन विधी संघर्ष बालक असल्याने त्यांना बाल सुधार न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.
या हल्ल्यामध्ये 1) सलमान जैनुउद्दीन राजे, (वय 26 रा.केडगाव ता. दौंड), 2) ज्ञानेश्वर दिलीप डोंगरे (वय 22 रा.इंदिरानगर,केडगाव), 3) तेजस उर्फ कार्तिक मारुती गायकवाड (रा. पत्राचाळी ,केडगाव) 4) ओंकार कैलास मोहिते (वय 21 रा.आंबेगाव ,केडगाव.) यांच्यासह अन्य दोन विधी संघर्ष बालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही घटना मंगळवारी दि.11 रोजी घडली होती ज्यामध्ये हर्षल गायकवाड आणि राहुल गायकवाड या दोघांवर सलमान राजे हा भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला पैशांच्या देवाण घेवाणीतून झाला असल्याचे फिर्यादीने जबाबात म्हटले आहे. दोन्ही युवकांवर सहा जणांनी कोयता आणि तलवारीच्या सहाय्याने जबरी हल्ला चढवला होता ज्यामध्ये दोन्ही युवक गंभीर जखमी झाले होते. हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते.
काल गुरुवारी रात्री आरोपींना ताब्यात घेण्यात यवतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाबळे आणि त्यांच्या टीमला यश आले होते. हे सर्व आरोपी सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांनी स्वतः होऊन हा हल्ला केला की त्यांना कुणी हल्ला करायला लावला, त्यांनी हल्ला करण्यासाठी कोयता, तलवारी कोठून आणल्या होत्या त्या त्यांनी आत्ता कुठे लपविल्या आहेत, यात त्यांचा अजून कोणी मास्टरमाइंड आहे का अश्या विविध तापसकामासाठी यवत पोलिसांनी या सर्व आरोपींची पोलीस कोठडी माननीय न्यायालयाकडे मागितली होती त्यावर माननीय न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी मान्य केली आहे.