अख्तर काझी
दौंड : दलित व मुस्लिम समाजावर वाढलेल्या अन्याय, अत्याचाराविरोधात, राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये दौंड वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासनाविरोधात शहरातून बाईक रॅली काढीत आंदोलन करण्यात आले. रॅलीमध्ये दलित, मुस्लिम समाजातील युवक सहभागी होते.
यावेळी तहसीलदार अरुण शेलार यांना निषेधाचे व मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, बीड जिल्ह्यातील परळी येथील जरीन खान या व्यक्तीचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला. परंतु पोलिसांवर खुनाचा खटला दाखल करण्याऐवजी व खून झाला असतानाही शासनाकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे नांदेड येथील अक्षय भालेराव प्रकरण, तळेगाव येथील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अलेक्झांडर यांना झालेली मारहाण प्रकरण अशा घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी संबंधित प्रकरणे गंभीर्याने घेऊन संबंधितांवर होणारा अन्याय कशा पद्धतीने थांबविता येईल याकरिता उपाय योजना कराव्यात. ज्या सनातनी अशा संघटनांवर बंदी आणावी. सदरच्या घटनांमध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा असेही निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे. शहरातील ईदगाह मैदानावरून निषेध रॅलीला प्रारंभ करण्यात आला. शहरातील सर्वच राष्ट्रपुरुषांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालय येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अश्विन वाघमारे म्हणाले की, मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दलित समाजाने पुढे येऊन त्यांना साथ दिली पाहिजे.
अश्विन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये बंटी वाघमारे ,रितेश सोनवणे, अजगर शेख, अजिंक्य गायकवाड ,मुन्ना सय्यद, सुमित सोनवणे, इम्रान नालबंद ,बबलू जगताप, आनंद रणधीर ,सोहन शिंदे ,शुभम वानखेडे, राजू जाधव आदी सहभागी होते.