अख्तर काझी
दौंड : दौंड – गोपाळवाडी रोड परिसरातील शिवराज नगर येथे भर दिवसा घरफोडी झाल्याची घटना घडली. घरफोडी मध्ये अज्ञात चोरट्याने तब्बल 1 लाख 45 हजार 200 रु. किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी दीपक अंकुश शिंदे (रा. ऑरनेट अपार्टमेंट, शिवराज नगर, दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दि. 10 जुलै रोजी दुपारी 12.50 ते 1.20 वा. च्या दरम्यान सदरची घटना घडली. फिर्यादी खाजगी नोकरी करतात,दि.10 जुलै रोजी दुपारी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांच्या घराच्या बंद दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला व घरात लाकडी कपाटात ठेवलेले सोन्या ,चांदीचे दागिने चोरून नेले.
शिवराज नगर व आसपासच्या परिसरामध्ये याआधीही अनेक चोऱ्या, घरफोड्या झालेल्या आहेत. अशा घटना वारंवार घडत असल्याने या परिसरामध्ये एखादी पोलीस चौकी व्हावी अशी येथील नागरिकांची अनेक वर्षापासून ची मागणी आहे. अशा घटना रोखण्यासाठी परिसरातील प्रत्येक सोसायट्यांमध्ये व रस्त्यांवर सीसीटीव्ही लावण्याची अत्यंत गरज आहे, जेणेकरून अशा घटनांचा तपास करताना पोलिसांना त्याची मदत होणार आहे. पोलीस प्रशासनाने सुद्धा प्रत्येक सोसायटीमध्ये सीसीटीव्ही लावले जावेत असे अनेक वेळा आवाहन केले आहे.
परिसरात होणाऱ्या घरफोड्या, हाणामारीच्या घटना रोखण्यासाठी फक्त पोलिसांवरच अवलंबून राहणे योग्य नाही त्यासाठी येथील स्थानिकांनी सुद्धा पोलिसांच्या सूचनांची अंमलबजावणी करून त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. तरच अशा घटनांवर अंकुश ठेवणे शक्य होणार आहे. पोलीस प्रशासनाने सुद्धा या परिसरातील पोलीस चौकीच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा असे स्थानिकांचे म्हणणे आहे.