पुणे | डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. Pradeep Kurulkar) याचा आणखी एक कारनामा उघड झाला असून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची हेर झारा दासगुप्ता हिला सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे देशाच्या विविध सुरक्षा प्रकल्पांची माहिती पुरविल्याचे दहशतवाद विरोधी पथक (ATS) च्या तपासात निष्पन्न झाले आहे.
डॉ.कुरुलकर हा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना (आर अँड डीई) या प्रयोगशाळेचा संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ आहे हे विशेष.
शास्त्रज्ञ डॉ.कुरुलकर याने ‘डीआरडीओ’ कडून विकसित करण्यात आलेल्या ब्रह्मोस, अग्नी, तसेच मिसाइल लाँचर आणि एमबीडीए या क्षेपणास्त्रांसह रुस्तुम, सरफेस टू एअर मिसाइल, इंडियन निकुंज पराशर या प्रकल्पांची आणि ‘डीआरडीओ’ च्या कामांची माहिती झारा हिला पुरविली आहे.
वार्धक्याकडे झुकलेला डॉ.कुरुलकर पाकिस्तानी महिला हेराच्या हनिट्रॅपमध्ये अडकल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. डॉ.कुरुलकर वर पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याचा ठपका ठेवण्यात आला असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.
त्याच्यावर, शत्रू राष्ट्राला संरक्षण क्षेत्राची माहिती देण्याची आणि त्यामुळे देशाच्या सुरक्षा व सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ होण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.