अख्तर काझी
दौंड : शहरातील रेल्वे परिसरात एका युवकाला मारहाण करून लुटण्याची घटना घडली. दौंड पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्र फिरवीत अवघ्या तासाभरातच तिघा चोरट्यांना मुद्देमालासह अटक केली.
याप्रकरणी अनिल गजानन जाधव(रा. हनुमान नगर ,गिरीम, दौंड) यांनी फिर्याद दिली. अक्षय सतीश नवगिरे, रोहित चंद्रकांत गायकवाड(दोघे रा. गोवा गल्ली, दौंड), रफिक अकबर शेख(रा. तुकाई नगर ,दौंड) ह्या तिघां विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी दि. 6 जुलै रोजी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास येथील रेल्वे वसाहत परिसरातील यादव वस्ती ते रेल्वे लायब्ररी( सीनियर) रस्त्यावरून आपल्या दुचाकीवरून जात असताना आरोपींनी आपली दुचाकी त्यांच्या दुचाकी ला आडवी मारली,व काही कळायच्या आतच त्यांना मारहाण करून जखमी केले व त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला. मारहाण होत असताना फिर्यादींनी मदतीसाठी आवाज दिला असता जवळच असणाऱ्या त्यांच्या मित्राने त्या ठिकाणी धाव घेतली त्यामुळे चोरटे पळून गेले.
फिर्यादी एका फायनान्स कंपनीमध्ये पैसे गोळा करण्याचे काम करतात. चोरट्यांकडून त्यांना मारहाण होत असताना त्यांच्याकडे असणाऱ्या बॅगेमध्ये मोठी रक्कम होती परंतु मित्र मदतीला धावून आल्याने पैशाची बॅग चोरट्यांच्या हाती लागली नाही अशी माहिती समोर येत आहे. फिर्यादी यांनी पोलिसांना येऊन सदर घटनेची खबर देताच दौंड पोलिसांनी जलद गतीने तपासाची चक्र फिरवीत शहरातील हिंदू स्मशान भूमी परिसरातून चोरट्यांना मुद्देमाला सहित ताब्यात घेतले.
दौंड पोलिसांनी तपासा दरम्यान फिर्यादींना त्यांच्या चोरीला गेलेल्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितले, चोरट्यांनी फोन उचलला व फिर्यादींकडे पैशाची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी त्या मोबाईलचे लोकेशन शोधून चोरट्यांना जागेवरच जेरबंद केले.पो. उपनिरीक्षक शहाजी गोसावी,पो. क. अमीर शेख, पांडुरंग थोरात, निखिल जाधव, रवी काळे व पोलीस मित्र बाळू जगदाळे पथकाने कारवाई केली.