कोरोनाच्या हिटलिस्टवर केडगाव गावठाण! फिल्टर प्लॅन्ट चालक, पाणी घरपोच देणारे पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली, 3 दिवसांत 24 रुग्ण सापडल्याने खळबळ



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव हे मोठे गाव असून केडगावातील गावठाण हे जुने केडगाव म्हणूनही त्याची ओळख आहे. सध्या हे केडगाव गावठाण कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागले आहे. 3 दिवसांत संपूर्ण केडगावमध्ये 24 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असून यात केडगाव गावठाणातील अनेक रुग्णांचा समावेश आहे.

एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात केडगाव गावठाणातील काही रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आणि त्यानंतर मात्र केडगाव गावठाणात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. 

मे महिन्यात कोरोनामुळे येथील दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून कोरोना बाधित काही रुग्ण घरीच क्वारंटाईन झाले असून अत्यवस्थ रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

केडगाव गावठाणात अनेकांना कोरोना झाल्याचे निदान होत असून याला नागरिकांचा हलगर्जीपणा कारणीभूत असून कोरोना टेस्ट करून घरी आल्यानंतर घरी न थांबता बाहेर फिरणे आणि त्या रुग्णांना कोरोना झाला आहे याची माहिती त्यांना वेळेवर न मिळाल्याने कोरोनाचा प्रसार जास्त प्रमाणात झाल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये केडगाव आणि परिसरात फिल्टर प्लॅन्ट चालवणाऱ्या आणि गाड्यांमधून लोकांच्या घरी जाऊन पाणी पोहोच करणाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आल्याने आता प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कारण हे लोक केडगाव आणि परिसरात किती लोकांना पाणी वाटप करत होते आणि त्यांचा कोरोनाची लक्षणे सुरू झाल्यापासून किती लोकांशी संपर्क आला आहे हे तपासणे गरजेचे बनले आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

जे फिल्टर प्लँट चालक पॉझिटिव्ह आले आहेत त्यांनी कुणाकुणाला घरपोच  पाणी वाटप केले आहे आणि त्यांच्या फिल्टर प्लांटवर येऊन कोणी कोणी पाणी घेऊन गेले आहेत याची संपूर्ण माहिती घेऊन त्या संबंधित लोकांची टेस्ट करण्यात येईल तसेच बाधित क्षेत्रामध्ये औषध फवारणीला प्राधान्य दिले जाईल अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुमित होनमाणे यांनी सहकारनामा शी बोलताना दिली आहे.