अब्बास शेख
दौंड : दौंडच्या उपविभागीय कार्यालयासाठी सुमारे 10 वर्षांपासून करण्यात आलेला पाठपुरावा आता कुठेतरी फायदेशीर ठरत असल्याचे दिसत असून शासनाने दौंड प्रांत कार्यालयासाठी आता हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. याबाबतची विस्तृत माहिती दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली यावेळी भीमा पाटस चे मा.उपाध्यक्ष आनंद थोरात उपस्थित होते. याबाबत राज्य शासनाकडून राज्यपत्र प्रसिद्ध करण्यात आल्याने आमदार कुल यांच्या निवडणूक आश्वासनातील आणखी एका आश्वासनाची पूर्तता झाल्याचे पहायला मिळत आहे.
दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय करण्याचे आश्वासन आमदार अॅड. राहुल कुल यांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिले होते. त्याची आता पूर्तता होताना दिसत असून, नुकतेच राज्य शासनाने दौंड स्वतंत्र उपविभागीय कार्यालयासाठी नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या आहेत. या हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख २७ जुलै २०२३ आहे.
दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय करण्याची अधिसूचना शासकीय राजपत्राद्वारे शासनाने दि. १८ सप्टेंबर २०१९ रोजी काढली असून, सूचना व हरकती मागविण्याच्या प्रक्रियेला निवडणूक आचारसंहितेमुळे विलंब झाल्यामुळे हे कार्यालय सुरु करण्याची प्रक्रिया थांबली होती.
त्यानंतर आमदार अड. राहुल कुल यांनी पुन्हा शासनाकडे पाठपुरवा करून तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचाकडे बैठका घेऊन, विधिमंडळाच्या वेगवेगळ्या अधिवेशनात हि प्रक्रिया पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नुकतेच हे राजपत्र प्रसिद्ध झाले असून, त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. दौंड तालुक्यासाठीचे हे स्वतंत्र उपविभागीय कार्यालयासाठी मागील अनेक दिवस प्रयत्न सुरु होते मात्र याकडे तत्कालीन सत्ताधारी यांनी बघितले ही नव्हते मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हे काम मार्गी लागत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याचेही आमदार अॅड कुल यांनी सांगितले.
दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्याच्या या प्रक्रियेला गती मिळाल्यामुळे आमदार अॅड. राहुल कुल यांनी त्यांच्या विधानसभा प्रचारातील आणखी एक महत्वाचे आश्वासनाची पूर्तता करण्यात त्यांना यश आले आहे.