सांगली, मिरजेमध्ये मान्सून च्या बरसल्या जोरदार सरी, पण जिल्ह्यांत काही तालुक्यामध्ये खुशी तर काही ठिकाणी अजूनही प्रतीक्षा

सांगली (सुधीर गोखले) : अखेर सांगली जिल्ह्याला असलेली मान्सून च्या आगमनाची प्रतीक्षा संपली गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यावर ढगांची गर्दी जमत होती पण मंगळवारी अखेर मान्सून च्या सरींनी सांगली मिरजेतील नागरिकांना चिंब भिजवले मंगळवारी दिवसभर मान्सूनने चांगली बॅटिंग केली पण जिल्ह्यामध्ये शिराळा, इस्लामपूर वगळता अजूनही काही तालुक्यात मान्सून ची प्रतीक्षाच आहे तेथील बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे पेरण्या खोळंबल्या आहेत.

काल दिवसभराच्या पावसाने सांगली मिरजेमध्ये मात्र रस्त्यावर पाणीच पाणी झाले मिरजेमध्ये रस्त्यावरील साठलेले पाणी निचऱ्याची सोय नसल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढत जावे लागले शहरातील सखल भागात पाणी साठून राहिल्याने चिखलमय परिस्थिती होती पण आज सकाळ पासून मिरज मध्ये पावसाने विश्रांती दिली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे आषाढी एकादशी च्या पार्श्वभूमीवर वरुणराजाचे आगमन झाल्याने यंदा वारकरी खुश आहेत तर ‘औन्दा पीक पाणी भरभरून दे’ अशी आर्त याचना शेतकरी वर्ग विठोबा चरणी करत आहे.

हवामान खात्याने पुढील काही दिवस तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे शेतकरी वर्गाला अजून काही दिवस मोठ्या पावसाची प्रतीक्षाच करावी लागेल.