सुधीर गोखले
सातारा : सातारा जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे गाव. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या जन्मगावी दरे येथे आले असून, त्यांनी गावातच जनता दरबार भरवून आलेल्या नागरिकांच्या समस्यांचा निपटारा केला. शेतीत रमत झाडांची लागवडही केली.
त्यांनी केळीसोबत नारळ, आंबा अशा विविध झाडांची लागवड करत आपल्या शेतीत फेरफटकाही मारला. कोयना नदीच्या उघड्या पडलेल्या पात्रातून पायपीट करत विविध समस्या घेऊन नागरिक आल्याने मुख्यमंत्र्यांनी जनता दरबार भरवून नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांना त्या तत्काळ सोडविण्याचे आदेश दिले. कोयना जलाशयामध्ये गाळाची भर अधिक होऊ लागली असून, ही सुपीक गाळयुक्त माती शेतीला अधिक उपयुक्त असून, शेतकऱ्यांनी हा गाळ माती काढून आपल्या शेतीत टाकल्यास पिकांना अधिक बळ मिळेल.
तर धरणातील गाळ माती कमी होऊन पाणीसाठ्यात वाढ होईल. त्या पाण्याचाही शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो. त्यामुळे गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार या योजनेचा कोयनेच्या नदीपात्रात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार महेश शिंदे, विविध खात्यांचे सचिव, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीसाठी रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे.