सुधीर गोखले
सांगली : ‘भेटी लागी जिवा लागलीसे आस’ सध्या अवघ्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी निमित्त वारीचा फिवर जडला आहे कर्नाटक सह कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक भाविक वारकरी आपल्या दिंड्यांसह पायी पंढरपूर येथे प्रस्थान करत आहेत.
पंढरपूरला जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या दिंड्या सांगली जिल्ह्यातील मिरज मार्गे जात असून मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या बाहेर पायी वारकऱ्यांच्या दिंड्यांचे स्वागत आणि त्यांच्या सेवेसाठी मिरजकर नागरिक सरावले आहेत. गेल्या आठवड्यापासून या ठिकाणी जेनरिक कार्ट प्रा लि चे संचालक श्रीपाद कोल्हटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, मित्रपरिवारानी वारकऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी कॅम्प मोफत सुरु केला आहे तसेच मिरजेतील केटरिंग व्यवसायातील उद्योजक चंद्रकांत देशपांडे प्रिंटिंग उद्योगातील उद्योजक आणि कलाकार विनायक इंगळे हे आपल्या कुटुंबासह या ठिकाणी वारकऱ्यांसाठी चहा आणि नाष्टयाची सोय उपलब्ध करून देत आहेत.
महापालिकेच्या अग्निशमन दलाचेही योगदान
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर कडे निघालेल्या पायी वारकऱ्यांकरिता सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाच्या वतीने तसेच आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंकली ते धामणी दरम्यान केळी,चहा,बिस्किट,लाडू,पाणी बॉटल आणि वेदनाशामक बाम तसेच आवश्यक साहित्य वाटप करण्यात येत आहे.
मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचीही सेवा
या वर्षी आषाढी वारीनिमित्त मार्गस्थ झालेल्या पायी वारकरी दिंड्यांचे स्वागत त्यांच्या आरोग्याची काळजी अधिष्ठाता डॉ रुपेश शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम घेत आहे त्यासाठी त्यांनी विशेष मेडिकल चेकअप कॅम्प घेऊन वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी केली आणि औषधउपचारही केले.
पायी चालल्याने वारकऱ्यांच्या पायाला आलेल्या सुजेसाठी सर्वानी वेदनाशामक मलम लावून प्रत्येक वारकऱ्यांच्या पायाचे मसाजही केली.
मिरज शहरात वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन
यंदा पायी वारी निमित्त मिरज मार्गे निघालेल्या दिंड्यासाठी मिरज शहर वाहतूक पोलिसांनीही चांगले नियोजन केले असून मोठ्या वाऱ्यासाठी पुढे प्रशासनाची गाडी स्पीकर सह दिंड्याना मार्ग खुला करून देत आहे. पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे विशेष लक्ष ठेऊन आहेत.