सुधीर गोखले
सांगली : संभाव्य पूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सांगली मधील सुमारे अडीच हजार कुटुंबाना महापालिका प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. कर्नाळ रस्ता, सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी, सांगलीवाडी, गावभाग, हरिपूर रस्ता, आणि शामरावनगरच्या परिसराचा यात समावेश आहे.
सन २०१९ मध्ये महापूरमध्ये या भागातील अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पुराच्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सांगली मिरजेतील तब्बल ४२ हजार कुटुंबाना महापुराचा फटका बसला होता तर २०२१ मध्ये ३२ हजार कुटुंबे स्तलांतरित केली होती. साधारण कृष्णा नदीची आयुर्विन पुलाजवळची पाणी पातळी ३२ फुटापर्यंत गेल्यावर सूर्यवंशी प्लॉट मध्ये पाणी शिरण्यास सुरवात होते तर ३५ फुटला संपूर्ण कर्नाळ रस्ता पाण्याखाली जातो.
त्यामुळे साधारण पाऊसमान सुरु होण्याअगोदर महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत पूरपट्ट्यातील कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या नोटीस वजा सूचना दिल्या जातात यंदा जून महिन्या मधेच मनपा ने नोटिसा पाठवल्या आहेत. नोटिसी मध्ये मनपा ने स्पष्टच केले आहे कि पुरामुळे होणाऱ्या नुकसानीस मनपा प्रशासन जबाबदार राहणार नाही आणि नुकसानभरपाई मिळणार नाही. नोटीस वाटपानंतर जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.