राहुल अवचर
देऊळगाव राजे : देऊळगावराजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने येथील रुग्णांची हेळसांड होताना दिसत असून अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांना सेवा मिळण्यात खूप अडचण येत आहे.
देऊळगावराजे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पाच उपकेंद्र आहेत तर या आरोग्य केंद्रात साधारणपणे दररोज 60 ते 70 रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत आहेत. तसेच रात्रीही अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. पण अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी अविनाश अलमवार आणि एक महिला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून सदर ठिकाणी मागील एक वर्षापासून महिला वैद्यकीय अधिकारी या कामावर नाहीत. त्यांची पुणे जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यामार्फत चौकशी चालू असल्याची माहिती मिळत असून याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याने एक वर्षापासून या जागेवर अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
महत्वाची बाब म्हणजे येथे चार शिपाई पदे आहेत. पण मान्य पदापैकी एकही शिपाई सध्या इथे उपलब्ध नाही त्यामुळे ओपीडी नंतर वैद्यकिय अधिकारी आणि एक आरोग्य सेविका यांनाच सर्व कामकाज बघावं लागतं अशी येथील परिस्थिती आहे. मागील काळात याठीकाणी कार्यरत असलेले अनेक कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत पण त्यांचा जागा अजुनतरी भरल्या गेलेल्या नाहीत. देऊळगाव राजे ते पुणे जिल्हा परिषद हे १०० किमी चे अंतर असल्याने व येथे वाहतुकीचे साधन उपलब्ध नसल्याने कोणी स्टाफ या ठिकाणी यायला तयार होत नसावेत अशी शंका येथील नागरिक बोलून दाखवत असून सर्व अधिकारी, कर्मचारी स्टाफ जिल्ह्याच्या दिशेनेच भरला तर ग्रामीण भागातील सेवेत खंड पडू शकतो आणि त्याचा फटका मात्र ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बसू शकतो अशी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामूळे वरिष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेऊन याठीकाणी असलेली रिक्त पदे त्वरित भरावी अशी मागणी होत आहे.
सध्याच्या परिस्थितीमध्ये मी एकटाच या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत आहे. काल रात्री एका बारा वर्षीय मुलीला सर्पदंश झालेला होता. पण कर्मचारी कमी असल्यामुळे मी स्वतः त्या मुलीला दौंड येथे उपचारासाठी घेऊन गेलो. सुदैवाने सर्प हा बिन विषारी असल्यामुळे मुलीला कुठल्याही प्रकारची इजा न होता तिचे प्राण वाचले आहेत.
डॉ. अविनाश अलमवार , वैद्यकीय अधिकारी देऊळगावराजे
देऊळगाव राजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी अधिकारी मिळावेत यासाठी पुणे जिल्हा परिषद यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा अजूनही अधिकारी मिळालेले नाहीत.
सरपंच स्वाती गिरमकर