covid 19 spreader! धक्कादायक – केडगाव-वाखारी जवळील कॅनॉलमध्ये ‛कोरोना’ रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका ‛धुवून’ ड्रायवर करतायत ‛अंघोळ ! नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर



| सहकारनामा |

दौंड : कोरोना तसेच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या आजारी आणि मृत रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिका केडगाव – वाखारी जवळील खडकवासला  नवीन मुठा उजवा कालवा(कॅनॉल)च्या पाण्यामध्ये सर्रासपणे धुतल्या जात असून येथे  अँबुलन्सवर असणारे ड्रायव्हरही अंघोळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे.

याबाबत केडगाव येथील काही जागरूक नागरिकांनी हा भयानक प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.  

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्ण, सामान्य आजाराने ग्रस्त रुग्ण तसेच मृत पावलेल्या रुग्णांच्या डेडबॉडीज पोहचवून आल्यानंतर हे अँबुलन्सवाले कॅनॉलच्या आत उतरण्याच्या रस्त्याने या अँबुलेन्स कॅनॉलमधील  स्वच्छ पाण्यामध्ये उतरवून त्यातील स्ट्रेचर व इतर साहित्य त्या पाण्यात घालून स्वच्छ करतात. भयानक म्हणजे या अँबुलेन्समधील पीपीई किट कॅनॉलच्या पाण्यामध्ये किंवा कॅनॉल लगत असणाऱ्या मोकळ्या जागेत फेकून दिले जाते. या अँबुलेन्सचे चालक हि अँबुलेन्स त्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतात आणि नंतर स्वतःही अंघोळ करतात.

खडक वासलावरून  कॅनॉलमध्ये सोडले जाणारे पाणी हे प्रमुखता शेती आणि विविध गावांत पिण्यासाठी असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांच्या प्रकल्पामध्ये वापरले जाते मात्र जर याच पाण्यात वरील गंभीर प्रकार केले जात असतील तर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हि खूपच काळजी करण्यासारखी बाब आहे यात शंका नाही.

त्यामुळे आता पाटबंधारे विभाग, महसूल विभाग आणि पोलिसांनी एकत्रितपणे या अँबुलेन्स चालकांवर संयुक्तपणे कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.