| सहकारनामा |
दौंड : सध्या कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. दौंड तालुक्यात आणि खासकरून केडगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर कोविड सेंटर असूनही कोणतेच कोविड सेंटर किंवा या कोविड सेन्टरमधील बेड हे रुग्णांविना खाली असल्याचे दिसत नाही.
प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीमध्येही केडगाव हे हिटलिस्टवर असल्याचे दिसत आहे. मात्र हे सर्व माहीत असतानाही केडगावकर मात्र नियमांची पायमल्ली करून बिनधास्तपणे चौका चौकात खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
केडगाव सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. येथे दररोज कोरोना रुग्ण सापडत आहेत त्यामुळे येथे जास्त प्रमाणात खबरदारी घेण्याची गरज आहे परंतु याच्या उलटी परिस्थिती येथे पाहायला मिळत आहे.
येथील नागरिकांना जणू कोरोना बाबत कुठलेच गांभीर्य नसल्याचे त्यांच्या कृतीतून समोर येत आहे. आता बेजबाबदार नागरिकांना पोलिसांनी आपल्या स्टाईलने आवरण्याची गरज निर्माण झाली असल्याचे अनेक नागरिक बोलत आहेत.
केडगाव आणि परिसरामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हि संख्या वाढण्यामागे खुद्द नागरिकच जबाबदार असल्याचे त्यांच्या कृतीतून पुढे येत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी जात असताना तोंडाला मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे हि काळाची गरज आहे मात्र या गोष्टींकडे केडगावकर साफ दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या चौका चौकात पाहायला मिळत आहे.