निरा : निरा येथील रेल्वे स्थानकावर आज रेल्वेरोको आंदोलन झाले. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
निरा येथील रेल्वेस्थानकावर द्रुतमार्ग झाला मात्र पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी प्लॅटफार्म नाही. तसेच ज्या दक्षिण भारत, उत्तर भारतात व अन्यत्र जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्या आहेत त्यांना निरा येथे थांबा नाही. त्यामुळे या पंचक्रोशीतील व उद्योगव्यवसायानिमित्त आलेल्या प्रवाश्यांना एकतर पुणे किंवा सातारा येथे जावे लागते. या कारणासाठी आज सर्व पक्षीय, सर्व संघटना व नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन करून केंद्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी रेल्वेप्रशासनच्या वतीने सर्व समस्या येत्या एकदोन आठवड्यात मार्गी लावू परंतु आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आंदोलकांना दूरध्वनीवरून संपर्क साधत याविषयी आपण अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सर्व प्रश्नांची सोडवणूक करू असे आश्वासन दिले. तसेच रेल्वे प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात आल्याने हे आंदोलन थांबविण्यात आले. प्लॅटफार्मवरून न उतरता आंदोलन यशस्वी झाल्याने येथील सर्व राजकीय नेते, संघटना यांच्या आंदोलनाला यश आल्याचे पहायला मिळाले. यावेळी नीरा रेल्वे स्टेशनवर आलेल्या रेल्वेच्या चालकाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते दत्ताआबा चव्हाण , विराज काकडे , उपसरपंच राजेश काकडे , अनिल चव्हाण , राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रमोद काकडे , अजित सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे , शहा , विजय धायगुडे , दादा गायकवाड, व नागरिक उपस्थित होते. आंदोलनावेळी पोलीस प्रशासन, रेल्वे पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.