| सहकारनामा |
मुंबई : कोरोना नंतर भयंकर बुरशीजन्य ‘म्युकर मायकोसिस’चा (mucormycosis) या फंगल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यासाठी राज्य सरकारने आता ‛म्युकर मायकोसिस’ या आजारावर उपचार करण्यासाठी त्याचा समावेश महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत केला असून त्यासाठी आवश्यक ३० कोटींचा निधी (fund in mucormycosis)
उपलब्ध करण्यात आला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिली आहे.
अजित पवारांनी राज्यातील कोरोना परिस्थितीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा बैठकीत हा निर्णय घेतला असून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिकचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिल्यानंतर प्रशासनानं उपाययोजनांसाठी तातडीनं पावलं उचलावीत, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले आहेत.
तिसऱ्या लाटेपूर्वी यथाशिघ्र राज्यातील लहान मुलांच्या सुरक्षेसाठी, उपचारांसाठी सक्षम स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात यावी. यामध्ये लहान मुलांचे व्हेंटिलेटर तसेच त्यांच्यासाठी लागणारी औषधे, इतर उपचारांसाठीची सामुग्री उपलब्ध करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. राज्यासाठी २५ हजार मेट्रीक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढण्यात येत असून ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी हवेतून ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या ‘पीएसए’ प्लँटची निर्मिती प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
उपलब्ध मेडिकल ऑक्सिजनचे राज्यात कार्यक्षमपणे वितरण होण्यासाठी कोविड रुग्णांची जिल्हानिहाय संख्या लक्षात घेऊन वितरण करण्यात यावे तसेच ऑक्सिजनचा काटेकोरपणे वापर होण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन नर्सची नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मेडिकल ऑक्सिजनच्या मागणीचे व्यवस्थापन आणि लेखापरिक्षण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या असून प्रत्येक जिल्ह्यातील प्लॅन्टच्या व रुग्णालयाच्या स्तरावर टेक्नीकल ऑडिट व मेडिकल ऑडिट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावे अशा सूचना केल्या आहेत.