Kedgaon (Daund) | केडगावच्या Essar पेट्रोल पंपावर जबरी चोरी, कामगारांच्या पँट चे खिसे कापून चाव्या काढत ऑफिस उघडून रक्कम ‘चोरली’

केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव हद्दीत असणाऱ्या इसार (Essar Petrol Pump) पेट्रोल पंपावर दोन अज्ञात चोरट्यांनी मोठ्या शिताफीने ३९ हजार रुपयांची रोकड चोरून नेली असल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पंपावर झोपलेल्या कर्मचाऱ्यांच्या पँट चे खिसे कापून ही चोरी करण्यात आली आहे.

समिर अशोक बारवकर (व्यवसाय पेट्रोलपंप, रा.केडगाव ता.दौंड जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समिर बारवकर यांनी ऑफिसमधील टेबलचे ड्रॉवरमध्ये पंपावर पेट्रोल व डिजेलचे विक्रीचे झालेले ३८,५००/- रूपये अंदाजे ७०० रूपये चिल्लर असे एकूण ३९,२००/- रूपये ठेवुन ऑफिसची चावी पंपावरील कामगार प्रदिप धर्मा गायकवाड व तन्मय केशव खराडे (दोघे रा. केडगाव ता दौंड जि.पुणे) यांच्याकडे दिली होती. कामगारांनी पेट्रोल पंपच्या ऑफिसची चावी पॅन्टच्या खिशात ठेवुन ते झोपी गेले.

त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅन्ट चे खिसे कापुन त्यामधील चावी काढून घेतली. त्यानंतर ऑफिसचे शटर उघडुन आतमध्ये प्रवेश करत ऑफिसमधील टेबलचे ड्रॉवर मधील ३९,२००/- रूपये चोरी करून घेऊन गेले. ही घटना दि.५ जून रोजी रात्री १२:४५ ते सकाळी ६:०० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात दोन चोरट्यांनी पेट्रोल पंपावर झोपलेल्या कर्मचाऱ्यांच्या पँटचे खिसे कापून त्यातील ऑफिसची चावी काढून घेत चोरी करण्याची ही केडगावमधील पहिलीच घटना आहे. पुढील तपास केडगाव चे पोलीस नाईक सोनवणे करीत आहेत.