‘आरग’ रेल्वे स्थानकावर होणार सुसज्ज मालधक्याची निर्मिती, राज्यातील 17 मालधक्यामध्ये आरग रेल्वे स्थानकाचा समावेश – महाव्यवस्थापक नरेश ललवाणी

सांगली : मध्यरेल्वे तर्फे राज्यातील १७ ठिकाणी सुसज्ज मालधक्के उभारण्यात येणार असल्याची घोषणा महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी केली. मध्यरेल्वेच्या मुंबई येथील मुख्यालयात वरिष्ठ विभागीय व्यवस्थापकांच्या वार्षिक परिषदेमध्ये महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी माहिती दिली या परिषदेमध्ये परीचालन, कोचिंग, नियोजन आणि मालवाहतूक विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मुंबई पुणे भुसावळ नागपूर आणि सोलापूर विभागातील परिचालन प्रमुख उपस्थित होते. राज्यातील १७ रेल्वे स्थानकांवरील मालधक्यांमध्ये मिरज तालुक्यातील आरग रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आल्याचे महाव्यवस्थापक लालवानी यांनी यावेळी सांगितले. सुसज्ज अशा मालधक्यांमध्ये वाहतूक व्यवस्था , प्रकाश व्यवस्था, मालधक्याना जोडणारे अंतर्गत रस्ते हमाल आणि कर्मचाऱ्यांना विविध सोई सुविधा विश्रांती खोल्यांची निर्मिती आदींचा समावेश असेल. साधारणपणे कळंबोली, कसबे सुकेणे, बोरगाव, खामगाव, सावदा, बुरहानपूर, नांदगाव, तांडाळी, बल्लारशाह, कलमेश्वर, मरामझीरी, नीरा, लोणी, विराद अहमदनगर, बेलापूर, दौड आणि सांगली जिल्ह्यातील आरग स्थानकात सुसज्ज धक्के तयार होतील.

लालवाणी यांच्याशी  ‘सहकारनामा’ प्रतिनिधींनी संपर्क साधला असता अधिक माहिती देताना लालवाणी म्हणाले कि सन २०२२-२३ मध्ये ८९.८८ दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली. तर सन २०२३-२४ मध्ये ९०.०५ दशलक्ष टन माल वाहतुकीचे लक्ष आहे. यामध्ये सर्वाधिक वाहतूक कोळशाची असेल. याशिवाय सिमेंट, साखर, खते बीबियाणे, औद्योगिक उत्पादने आदींचाही समावेश असेल. सोलापूर विभागातून आरग कवठेमहांकाळ हे महत्वाचे मालधक्के आहेत. तर पुणे विभागामध्ये मिरज आणि कोल्हापूर येथील मालधक्के आहेत येथून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची मालवाहतूक होते. आरग येथून साखर वाहतूक जोरात आहे मोहनराव शिंदे साखर कारखान्याची वाहतूक येथून होते तर कवठेमहांकाळ मधून साखर वाहतूक भारताच्या थेट दक्षिण व पूर्व भागात पाठवला जातो त्यामुळे आरग रेल्वे स्थानकावरील मालधक्का सुसज्ज करण्याचा निर्णय रेल्वेने घेतल्याचे त्यांनी सांगितले.