आपल्या करियरमध्ये कष्ट हवेत, युवकांनी कष्टाची तयारी ठेवावी – पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे

सुधीर गोखले

सांगली (मिरज) : आपल्या करियरमध्ये कष्ट हवेत त्यामुळे युवकांनी कष्टाची तयारी ठेवावी असे प्रतिपादन राज्याचे कामगारमंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री ना. डॉ सुरेश खाडे यांनी केले. खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि दास बहुद्देशीय विश्वस्थ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी मंत्री खाडे म्हणाले कि, ‘आयुष्यात जर  यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. यशाच्या आलेखामध्ये कष्टाचा वाट मोठा असतो तोच आपल्या यशस्वी बनवतो. त्यामुळे नेहमी युवकांनी कष्टाची तयारी ठेवावी’ असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी तब्बल १,६०७ युवकांनी मुलाखती दिल्या त्या मधील ५२७ उमेदवारांची प्राथमिक तर १७१ उमेदवारांची अंतिम अशा जवळजवळ ६९८ उमेदवारांची निवड मेळाव्यात झाली.

गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक तसेच भाजप अनु जाती मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रा मोहन वनखंडे, प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, तहसीलदार सौ अपर्णा मोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहा आयुक्त जमीर करीम, मनपा आयुक्त सुनील पवार, समाजकल्याण सभापती सौ अनिता वनखंडे, युवा नेते सुशांत खाडे, उपस्थित होते.

यावेळी मंत्री खाडे म्हणाले कि,’निवडल्या गेलेल्या युवकांना आता चांगली आपले करियर करायची चांगली संधी आज मिळाली आहे या संधीचे सोने करा आपला व आपल्या कुटुंबाचा नावलौकिक वाढवा आज मोठ्या कंपन्या इथे आल्या त्यांनी आपल्या दारात येऊन नोकऱ्या दिल्या आहेत’.या मेळाव्यात ६९ कंपन्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये टाटा आटो कॅम्प सिस्टीम एस के एफ इंडिया, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, सिप्ला, भारत फोर्ज, किर्लोस्कर ऑइल इंजिन, मेनन ग्रुप, महाबळ मेटल्स, घोडावत कंझुमर, किर्लोस्कर ब्रदर्स, अशा प्रमुख कंपन्यां होत्या.

यावेळी मुलाखतीला उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी केला याप्रसंगी नागरिकांना आपल्या समस्या नोंदवण्यासाठी www.sureshkhade.com या संकेतस्थळाचे अनावरण मंत्री खाडे यांच्या हस्ते करण्यात आले.