Kolhapur| पास होणार नाही म्हणून मित्रांनी वर्षभर डिवचले, अखेर पठ्ठया 51 टक्क्यांनी पास होताच गुलालाची उधळण आणि थेट उंटावरून काढली मिरवणूक

विभागीय प्रतिनिधीसुधीर गोखले

आपल्या उज्वल आयुष्याचा व शैक्षणिक भवितव्याचा पाया रचणाऱ्या दहावी निकालाची उत्सुकता पालकांना असतेच तसेच मित्रमंडळींना अधिक असते. काहीतरी हटके करण्यात कोल्हापूरकर आघाडीवर असतात असाच एक प्रसंग काल घडला.

हौसेला आणि जल्लोषाला कोल्हापूरकर नेहमी अग्रेसर असतात. आज दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आणि मित्र पास झाला म्हणून चक्क त्यांच्या मित्रांनी त्याची मिरवणूक उंटावरून काढली आणि गुलालही उधळला याच मित्रांनी त्याला पास होणार नाही म्हणून वर्षभर चिडवले होते. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. समर्थ सागर जाधव असे या मिरवणूक काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे समर्थ ने एस एम लोहिया हायस्कुल मधून दहावीची परीक्षा दिली होती तो पासच होणार नाही म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला वर्षभर चिडवले खुळ्यात काढले होते.

मात्र आज दहावीचा निकाल लागला आणि समर्थ चक्क ५१ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. मात्र त्यानंतर त्यांच्या मित्रांनी “भावा ! पास झालास” असे म्हणत समर्थची थेट उंटावरून मिरवणूकच काढली आणि आपले असलेले समर्थ वरचे प्रेम दाखवून दिले. कोल्हापुरातल्या गंगावेश परिसरात जवळजवळ तासभर हि मिरवणूक सुरु होती. यंदा दहावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल ठरला तर ९६.२२ टक्के निकालाने कोल्हापूरने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.