Big News |‘अहमदनगर’ जिल्ह्याचे नाव आता ‘अहील्यानगर’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

अहमदनगर : औरंगाबाद, उस्मानाबाद नंतर आता अहमदनगरचेही नाव बदलण्यात येऊन अहमदनगर आता अहील्यानगर म्हणून ओळखले जाणार आहे. याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे.

अहमदनगरमधील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये या निर्णयाची घोषणा करत असून चौंडी येथील अहिल्यादेवी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात ही घोषणा केली हे आमचं भाग्य असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

पुढे बोलताना त्यांनी, आहिल्यादेवी होळकर यांचे नाव हे हिमालय पर्वताएवढे मोठे आहे. अहिल्यादेवी यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी खूप काही केलं आहे. त्यांचे खूप मोठे योगदान आहे त्यामुळे त्यांचे नाव या जिल्ह्याला देताना आपल्याला मोठा आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना आहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी दिसली नसती, आहिल्यादेवी यांनी कधीही भेदभाव केला नाही असे म्हणत अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झाल्याने आपण आनंदी आहोत आणि यापुढेही त्यांच्या विचारांचा वारसा असाच सुरू राहील असे सांगितले.