सुधीर गोखले
सांगली (बागणी) : औरंगजेब मेला नाही तर तो आजही ‘ईडी’ रूपात जिवंत असल्याचे दिसून येत आहे. आमच्या बहुजन समाजाला पोथी पुराणांची नाही तर संत तुकोबारायांच्या गाथांची गरज असून आमच्या थोर समाजसुधारकांनी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आपले जीवन खर्ची घातले त्यांचे काम आता राष्ट्रवादी पक्ष करत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले. सांगली जिल्ह्यातील बागणी ग्रामपंचायती मधील छत्रपती संभाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. मिटकरी पुढे म्हणाले कि काही लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा संकुचित करून त्यांची बदनामी केली. अठरा पगड जातींना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली त्यांचा वारसा पुढे चालवत संभाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला पण काही लोकांनी त्यांना बदनाम केले. आताही राजकारण करून युवकांची माथी भडकवण्याचा प्रकार सुरु आहे मी देखील धार्मिक आहे पण धर्मांध नाही कोणत्याही जाती धर्माचा तिरस्कार करत नाही.
माजी मंत्री जयंती पाटील म्हणाले कि आमच्या रक्ताचा गुणधर्म असा आहे कि आम्ही कोणापुढे वाकत नाही कोणालाही घाबरत नाही माझ्यावर प्रम करणाऱ्या माझ्या जनतेला कोणी माझ्या विरोधात बोललेले सहन होत नाही बागणी गावाला ऐतिहासिक वारसा आहे हे तैलचित्र युवकांचा स्वाभिमान जागृत ठेवेल. यावेळी सरपंच तृप्ती हवलदार, उपसरपंच संतोष घनवट, सुभाष हवलदार ,राजेंद्र पवार, वैभव शिंदे, बाळासाहेब पाटील, ग्रामविकास अधिकारी कुमार भिंगारदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.