दौंड रेल्वे स्थानकाचे रंग-रूप पालटणार,
रेल्वे स्थानकाचा ‛अमृत भारत’ योजनेत समावेश

दौंड : दौंड रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश झाल्याने आता या रेल्वे स्थानकाचे सारे रूपच पालटणार असल्याची माहिती सोलापूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार लोहारे यांनी सोलापूर येथे पार पडलेल्या विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत दिली.

यावेळी सोलापूर रेल्वे सल्लागार समिती सदस्य रोहित पाटील ,दौंड- पुणे प्रवासी संघाचे पदाधिकारी विकास देशपांडे व रेल्वे अधिकारी उपस्थित होते. दौंड रेल्वे स्थानक अमृत भारत योजनेत समाविष्ट झाले आहे त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये रोहित पाटील यांनी दौंड रेल्वे स्थानक तसेच दौंड कॉर्डलाईन रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या तसेच त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांविषयी माहिती देऊन अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. प्लॅटफॉर्म क्रमांक २ येथील चौकशी कक्ष, दक्षिणेकडील बुकिंग ऑफिस येथे तातडीने घेण्यात यावे, लोणावळा-पुणे लोकल दौंड पर्यंत आणावी, आदि मागण्या रोहित पाटील यांनी सुचविल्या

या बैठकीला सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे, अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार, वाणिज्य प्रबंधक लक्ष्मण रणयेवले, परिचालन प्रबंधक प्रदीप हिरडे, मंडल अभियंता चंद्रभूषण आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग नोंदवून सकारात्मक सहकार्याचे आश्वासन दिले.