Daund : तौते वादळात खडकी येथील 2 एकरातील आंब्याच्या बागेचे नुकसान, शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत



|सहकारनामा|

दौंड : दोन दिवसांपूर्वी आलेल्या तौते वादळाचा फटका राज्याच्या काही भागात चांगलाच बसला आहे. तौते वादळामुळे दौंड तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या आंब्यांच्या बागांचेही नुकसान झाले असल्याचे माहिती आता समोर येत आहे. मात्र या बागांचे झालेले नुकसान आणि त्याचे पंचनामे करायला अजूनही कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आले नसल्याची खंत खडकी येथील शेतकरी रघूनाथ काळे यांनी व्यक्त केली आहे.



 

रघुनाथ काळे यांची खडकी (ता.दौंड) येथे शेतजमीन असून त्यांनी सुमारे 2 एकर जमिनीमध्ये आंब्यांची बाग लावलेली आहे. वर्षातून एकदाच या आंब्याचे उत्पादन होत असल्याने शेतकऱ्याला त्याचे वर्षाकाठीच उत्पन्न मिळत असते. 



मात्र अचानक आलेल्या या तौते वादळामुळे हातातोंडाशी आलेली आंब्याची फळे तुटून जमिनीवर पडली आहेत त्यामुळे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून संबंधित खात्याने या ठिकाणी जाऊन झालेल्या नुकसानीचा त्वरित पंचनामा करणे गरजेचे बनले आहे.