सहकारनामा ब्युरो
पुणे : दौंड तालुक्यातील यवत पोलिस स्टेशन आणि दौंड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांच्या कचाट्यातून आरोग्यविभाग आणि भक्तांचे श्रद्धास्थान असलेली देवीची मंदिरे सुद्धा सुटलेली दिसत नाहीत. दोन्ही ठिकाणचा मिळून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे.
प्राप्त माहितीनुसार चोरट्यांनी दौंड पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या दौंड उपजिल्हा रुग्णालयातील 17 ऑक्सिजन जम्बो सिलेंडर, 6 ऑक्सिजन प्लोमीटर, एक 3 एच.पी. ची मोटर, ऑक्सिजन वाहून नेणारे 40 मीटर तांब्याचे पाईप असा एकूण 1 लाख 59 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत अजिनाथ नामदेव खारतोडे यांनी फिर्याद दिली असून दौंड पोलीस अधिक तपास करीत आहेत.
असाच चोरीचा भयंकर प्रकार यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सहजपूर येथे घडला असून सहजपूर येथील मळाई माता मंदिरात चोरट्यांनी प्रवेश करून देवीच्या अंगावरील सोन्याची बोरमाळ, ठुसी, डोक्यामधील चांदीचा मुकुट तसेच मंदीरामध्ये देवीचे चांदीचे सहा मुखवटे असा एकुन 1 लाख 75 हजार रुपये कीमतीचे दागीने, मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत देवीचे पुजारी लक्ष्मण धोंडिबा गायकवाड यांनी फिर्याद दिली असून यवत पोलीस अधिक तपास करत आहेत.
दौंड शहर आणि दौंड ग्रामिण मध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलीस प्रशासनाने यावर वेळीच पायबंद घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
टीप – कृपया कॉपीपेस्ट बहाद्दर स्वयंघोषित पत्रकारांनी बातमी चोरण्याचा प्रयत्न करू नये, तसेच यातील आहे तसा मजकूर आपल्या बातमीत उतरवू नये, अन्यथा जनताच आपला अपमान करील आणि आम्ही कारवाई करू ती वेगळीच, त्यामुळे जनाची नाही निदान मनाची तरी… धन्यवाद