केडगाव | राजकीय द्वेषापायी 10 लाखांचा निधी परत गेला ! रस्ता, ड्रेनेज चे काम निधी असूनही रखडवले – ग्राप. सदस्यांचा आरोप

केडगाव / दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा एकदा सार्वजनिक सुविधांवरून ग्रामपंचायत सदस्य आक्रमक झाल्याचे दिसत असून राजकीय द्वेषापायी केडगावस्टेशन मधील सुमारे 10 लाख रुपयांचा विकास निधी परत गेला असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ यांनी केला आहे.

केडगाव स्टेशनमध्ये नागरी सुविधा मधून सुमारे 3 लाख रुपये ड्रेनेज साठी व सुमारे 7 लाख रुपये काँक्रीट रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता. तो निधी सुमारे दोन वर्ष खर्च न केल्यामुळे परत गेला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे भूमिपूजन हे खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते हे ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांना न आवडल्यामुळेच तेथे कृत्रिम वाद दाखवून तो निधी वेळेत खर्च नाही केला त्यास पूर्णता सरपंच व ग्राम विकास अधिकारी जबाबदार असून ह्या कामासाठी ग्रामपंचायत ने स्वतः ठेकेदार होण्याचा अट्टाहास केला परंतु काम मात्र केले नाही असा आरोप केडगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन कुतवळ यांनी केला आहे.

सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासन करत आहे. 8-8 दिवस पाणी न येणे 8-8 दिवस कचरा गाडी न येणे यामुळे आधीच या गोष्टीमुळे नागरिक त्रस्त आहेत. ग्रामपंचायत उत्पन्नमधील सुमारे 70 टक्के कर हा केडगाव स्टेशनमधील नागरिकांकडून जबरदस्तीने वसूल केला जातो व त्याच नागरिकांना सुविधा देण्यात मात्र ग्रामपंचायत टाळाटाळ करते. राजकीय द्वेषापायी विकास कामांना खीळ घालून सर्वसामान्य जनतेला त्रास देण्याचा प्रकार सध्या केडगाव ग्रामपंचायत करत असल्याचा आरोप यावेळी नितीन कुतवळ यांनी केला आहे.

एका प्लॉटच्या वादामुळे गायकवाड नामक व्यक्तीने केडगाव ग्रामपंचायतीला तक्रारी अर्ज दिला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू केले नाही.

अजितकुमार शेलार – सरपंच, केडगाव ग्राप.

जेथे वाद आहे तो प्लॉट 300 मीटर अंतरावर आहे, सध्या रस्त्याचा निधी 70 मीटरचा आलेला होता. तितका रस्ता करण्यात काहीच हरकत नाही

नितीन कुतवळ – सदस्य, केडगाव ग्राप.